पुँछ हल्ल्यानंतर शोधमोहीम आणि धरपकड

जम्मू आणि कश्मीरच्या पुँछ जिह्यात हवाई दलाच्या ताफ्यावर शनिवारी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यानंतर आज राष्ट्रीय रायफल्सची तुकडी आणि पोलिसांनी संपूर्ण जिह्यात शोधमोहीम राबवत अनेकांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मोहल्ला आजाद, मोहल्ला पुरानी, पुँछसह पुलस्त आणि बेतार नदीजवळील सर्व ठिकाणे तपासण्यात आली.  घरे, शेत-शिवारे, नद्या नाले सर्व ठिकाणी अतिशय बारकाईने दहशतवाद्यांचा शोध घेतला. दरम्यान, सुरक्षा दलांनी सैन्यदलाने हॅलीकॉप्टरच्या माध्यमातून हवाई सर्वेक्षणही करण्यात आले.

जम्मूचे अतिरीक्त पोलीस आनंद जैन, सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि तपास यंत्रणांनी सुरनकोट परिसर आणि ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे भेट दिली.  हवाई दल, सैन्य दल आणि पोलिसांनी शाहीस्तर, गुरसई, सनई आणि शिंदरा टॉप या ठिकाणी सैन्य दल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली, निमलष्करी दलाचे जवानही या शोधमोहिमेत सहभागी झाले होते. दहशतवाद्यांनी एके 47 रायफल्ससह अमेरिकन बनावटीची एम4 कार्बाईन, स्टील बुलेट यांचा वापर केल्याने मोठय़ा संख्येने जवान जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हवाई दलाचे प्रमुख मार्शल व्ही.आर. चौधरी आणि हवाई दलाच्या सर्व कर्मचारी, अधिकाऱयांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विक्की पहाडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

एकुलता एक मुलगा गमावला

शहीद विकी पहाडे हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवाशी. हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना हॅलीकॉप्टरमधून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री उशिरा उपचारादरम्यान पहाडे यांनी अखेरचा श्वास घेतला. विकी पहाडे हे त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक होते.  त्यांच्या पश्चात आई दुलारी  पत्नी रिना पहाडे, मुलगा हार्दिक आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासले

याआधीही दहशतवाद्यांकडून सातत्याने जम्मू-कश्मीरमध्ये हल्ले करण्यात आले आहेत. पुँछ जिह्यात झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमेहीम राबवली. काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी सर्चमोहीम राबवली, घरे, शेत-शिवारे आणि नदी-नाले सर्व ठिकाणी अतिशय बारकाईने दहशतवाद्यांचा शोध घेतला. ही शोधमोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अधकारी म्हणाले.

भ्याड दहशतवादी हल्ला

हा भ्याड दहशतवादी हल्ला असून या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकसंघपणे उभे आहोत. शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे खरगे यांनी एक्सवरून म्हटले आहे.

 कडेकोट बंदोबस्त

सहाव्या टप्प्यात अनंतनाग, राजौरी येथे 25 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराने आतापासूनच या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. हल्ला झाल्यानंतर हा बंदोबस्त आणखी वाढवला आहे.