Lok Sabha Election 2024: काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई राजकीय द्वेषातून, नाना पटोले यांची टीका

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भितीने भाजपला ग्रासले असून त्याच भितीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

“रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असले तरी घाबरण्याचे कारण नाही. काँग्रेस पक्षाने त्या मतदारसंघात दुसरा अर्ज आधीच दाखल केलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्ष घाबरलेला असून ते खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत. स्वाभाविक आहे की सत्तेतून बाहेर जाण्याची भीती भाजपला सतावत असल्याने अशा प्रकाराचे राजकारण ते करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली तर, शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तिकर यांना ईडीने नोटीस पाठवली. हे सर्व प्रकार पराभवाच्या मानसिकतेतून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी भाजप करत आहे,” गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

“भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषित विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणूक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत. त्यामुळे 400 पारच्या घोषणा पोकळ आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. भाजपने 10 वर्षात देशाची बरबादी केली, जाती-धर्मामध्ये वाद लावले, देशाला व जनतेला आर्थिक कमजोर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागेल आणि जनता जनार्दनच भाजपला इंगा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.