डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी पूर्ण, 11 वर्षांनंतर 10 मे रोजी निकाल

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुमारे अडीच वर्षं चाललेली सुनावणी पूर्ण झाली असून येत्या 10 मे रोजी खटल्याचा निकाल लागणार आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल 8 वर्षांनी खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीच्या काळात पुणे पोलीस करत होते. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जून 2014मध्ये तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
सप्टेंबर 2021मध्ये डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चित झाले.
सुरुवातीला वर्षभर या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्यासमोर झाली. त्यांच्या बदलीनंतर हे प्रकरण न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात गेले. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी 20 साक्षीदार तपासले.