ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष; अनिता श्योरण यांचा केला पराभव

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाची अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे ते भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष होणार आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिता श्योरण यांचा पराभव केला आहे. याआधी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दावा केला होता की, संजय सिंह हेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असतील.

संजय सिंह यांचा कुस्ती हा आवडता खेळ असून सध्या ते वाराणसीतील कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच कुस्ती संघाच्या राष्ट्रीय संयुक्त सचिवपदाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. ते अनेकदा संघाच्या कार्यसमितीच्या बैठकीतही सहभागी झाले आहेत. तसेच भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी अनेकदा परदेश दौरेही केले आहेत. पूर्वांचलमधील महिला पहेलवानांना प्रोत्साहन देत त्यांना पुढे आणण्यात संजय सिंह यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येते.

संजय सिंह हे बृजभूषण यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिता श्योरण या बृजभूषण यांच्या विरोधक आहेत. कुस्तीपटूंच्या लोगिंक अत्याचारप्रकरणी श्योरण यांनी बृजभूषण सिंह विरोधात जबाब दिला होता. तसेच कुस्तीच्या मैदानातही त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. 2010 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. मात्र, आतापर्यंत कुस्ती महासंघावर पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहेत. आताही झालेल्या निवडणुकीत संजय सिंह यांनीच विजय मिळवला आहे.