कोरोना महामारीचा दुष्परिणाम; जागतिक आयुर्मानात दीड वर्षांनी झाली घट

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेले होते. त्यावेळी झालेल्या आर्थिक नुकसानीतून अनेक देश सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या महामारीमुळे अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. तसेच जागतिक आयुर्मानावरही त्याचा परिणाम झाला आहे. कोरोना महामारीमुळे जागतिक आयुर्मानात दीड वर्षांनी घट झाली आहे. 2019 ते 2021 या काळात आलेल्या ‘कोरोना 19’ महामारीमुळे जागतिक आयुर्मान 1.6 वर्षांनी घटले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘द लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनामध्ये काढण्यात आला आहे.

या निष्कर्षांमुळे आतापर्यंत झालेल्या प्रगतीने उलटा प्रवास केल्याचे दिसून येत आहे.‘इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’ यांच्या समन्वयाने हे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी’ (जीबीडी) 2021च्या अद्ययावत अंदाजांचाही समावेश करण्यात आला आहे.जागतिक लोकसंख्येचे वय वाढण्यासंबंधी करण्यात आलेल्या संशोधनाचाही समावेश आहे.

कोरोना महामारीच्या कालावधीत 84 टक्के देश आणि भूप्रदेशातील आयुर्मान घटले असा निष्कर्ष या संशोधनामध्ये आढळले आहे. यावरून करोना विषाणूचे विध्वंसक परिणाम दिसून येतात असे संशोधकांनी नमूद केले आहे. जगभरात यापूर्वी प्रौढांच्या मृत्युदरात घट होण्याच्या कलाने उलटा प्रवास करून 2020 आणि 2021 या दोन वर्षांमध्ये प्रौढांच्या मृत्युदरात वाढ झाल्याचे दिसून आले.