मुलाने बौद्ध तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केले, भाजप नेत्याची पक्षातून हकालपट्टी

भारतीय जनता पक्षाने (भाजप) लडाखमधील पक्षाचे उपाध्यक्ष नझीर अहमद यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. नझीर यांच्या मुलाने पळून जाऊन एका बौद्ध मुलीशी लग्न केले आहे. या मुलीला पळवून नेून तिच्यासोबत लग्न लावून देण्यासाठी नझीर यांनीमदत केली आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी पक्षाकडून नझीर यांना नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी त्यांना वेळही देण्यात आला होता. मात्र ताज्या वृत्तानुसार नझीर यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुलाने बौद्ध तरुणीला पळवून नेत तिच्यासोबत लग्न केल्याने जातीय सलोखा आणि एकात्मता धोक्यात आली आहे, असे सांगून भाजपने नझीर यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले आणि पक्षाचे सदस्यत्वही रद्द केले आहे.

नजीर अहमद यांचा मुलगा मंजूर अहमद याच्यावर एका बौद्ध महिलेचे अपहरण करून तिच्यासोबत न्यायालयात जाऊन लग्न केल्याचा आरोप आहे. नझीर यांचा यात सहभाग आहे की नाही हे स्पष्ट करण्याची संधी देण्यात आली होती, असे पक्षाचे म्हणणे आहे. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने पक्षाने त्यांच्याकडील सर्व जबाबदाऱ्या परत घेण्याचा आणि पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला.

भाजपने या संदर्भात पत्रक जारी करून म्हटले आहे की, “प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष नजीर अहमद यांना अपहरण आणि विवाह प्रकरणात सहभाग स्पष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना दिलेली वेळ संपल्यानंतरच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. लडाखमध्ये घडलेली ही घटना सर्व धार्मिक समुदायांसाठी अयोग्य असून यामुळे जातीय सलोखा आणि एकता धोक्यात आली आहे.

पक्षातून काढून टाकल्यानंतर नजीर अहमद यांनी म्हटले आहे की, ते आणि त्यांचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. मुलगा आणि बौद्ध तरुणी गेला महिनाभर कुठे होते हे त्यांना माहीत नाही. नझीर यांनी म्हटले आहे की आपण या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आपण हज यात्रेसाठीसाठी सौदी अरेबियाला गेलो असताना मुलाने हा सगळा प्रकार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुलाने बौद्ध तरुणीला पळवून नेत तिच्याशी लग्न केलं. यासाठी मला का जबाबदार धरले जात आहे, माहीत नाही असं नझीर यांनी म्हटले आहे. मी आणि संपूर्ण कुटुंब या लग्नाच्या विरोधात आहोत, असे नजीर यांनी म्हटले आहे.