‘नेस्ले’ वादाच्या भोवऱयात; उत्पादनांत साखरेचे प्रमाण जास्त; मुलांच्या आरोग्याशी खेळ

स्वित्झर्लंडची कंपनी ‘नेस्ले’ वादाच्या भोवऱयात सापडली आहे. या कंपनीच्या हिंदुस्थानात सर्वाधिक विक्री होणाऱया दोन उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आढळले आहे. मात्र युरोप, जर्मनी, ब्रिटनमधील याच उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण आढळत नाही. त्यामुळे नेस्ले कंपनी मुलांच्या आरोग्याशी खेळत असून विकसित व विकसनशील देशांबाबत भेदभाव करत असल्याची बाब उघड झाली आहे.

हिंदुस्थानात नेस्लेच्या दूध आणि सेरेलॅकसारख्या प्रोडक्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त साखर आहे. नेस्लेच्या उत्पादनाची तपासणी केली. यामध्ये कंपनी गरीब, विकसनशील देशांतील लहान मुलांच्या उत्पादनात जास्त साखर वापरत असल्याचा दावा ‘पब्लिक आय’ने केलेला आहे.

विशेष म्हणजे कंपनी त्यांच्या प्रोडक्टस्च्या माहितीपत्रकावर जीवनसत्त्वे आणि खनिजांची माहिती देते, पण साखरेचा यामध्ये उल्लेख नसतो.

शेअरमध्ये झाली घसरण

‘पब्लिक आय’च्या अहवालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. गुरुवारी बाजार उघडताच नेस्लेचा शेअर 3 टक्क्यांनी घसरून 2 हजार 462 रुपयांवर आला. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

दाव्यानुसार, कंपनी हिंदुस्थानातील बेबी प्रोडक्टस्मध्ये  प्रत्येक सार्ंव्हगमध्ये अंदाजे 3 ग्रॅम साखरेचा वापर करते, तर युरोपीय देशांमधील लहान मुलांच्या उत्पादनात साखरेचा दाणासुद्धा नसतो.

 


कंपनीचा खुलासा  

आम्ही जिथे काम करतो तिथल्या मानकांचे पालन करतो. गेल्या पाच वर्षांत आम्ही लहान मुलांच्या तृणधान्य श्रेणीतील साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी केले, असा खुलासा ‘नेस्ले’ने केला.