टेंशन वाढले! ठाणे आणि सिंधुदुर्गात कोरोनाचा नवा व्हेरिएंट

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून देशभरात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोनाच्या जेएन-1 या नव्या सब व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. ठाण्यात आणि सिंधुदुर्गात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-1 चा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी आढळला होता. केरळमध्ये आढळलेला नवा व्हेरिएंट जीएन-1 मुळे ही रुग्णवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. केरळमध्ये एकाच दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळपाठोपाठ आता महाराष्ट्रातदेखील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएन वनचा नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. 19 वर्षीय तरुणीला नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याने तिच्यावर कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या तरुणीला मंगळवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत नाजूक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. येथील एका 41 वर्षीय पुरुषाला या व्हेरिएंटची लागण झाली आहे.

– बुधवारी राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळले. एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली असून यामध्ये मुंबईत सर्वाधिक 27 सक्रिय रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

गेल्या 24 तासांत देशात 614 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. 21 मेनंतर पहिल्यांदाच इतकी मोठी रुग्णवाढ.