निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरण, 104 जणांच्या चौकशीनंतर घातपाताचा कोणताही पुरावा नाही

निलीमा चव्हाणसोबत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मैत्रिणी, महाविद्यालयातील मैत्रिणी, नोकरीच्या ठिकाणी असणारे तिचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी, प्रवासादरम्यान भेटणारे एसटी कंडक्टर, सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारे ग्रामस्थ, स्थानिक मच्छिमार अशा एकूण 104 साक्षीदारांकडे चौकशी केली. मात्र चौकशीत घातपाताचा पुरावा सापडला नाही. व्हीसेरा तपासणीचा अहवाल प्राप्त होताच निलीमा चव्हाणच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

29 जुलैपासून चिपळूण ओमळी येथील तरुणी निलीमा चव्हाण बेपत्ता झाली. तिचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडला. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला. तपासानंतर आज पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी माहिती दिली. निलीमा चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर मृत्यूपूर्व जखमा तसेच अंतर्गत जखमा दिसून आल्या नाहीत. डॉक्टरांनी व्हिसेरा तपासणीकरीता राखून ठेवला असून लवकरच व्हिसेराचा तपासणी अहवाल प्राप्त होताच मृत्यूचे कारण निश्चित होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला. व्हिसेराचा अहवाल प्रथम प्राधान्याने मिळावा याकरीता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून लघू न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा रत्नागिरी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. मृतदेहाच्या डोक्यावरचे केस आणि भुवयांवरचे केस गेले होते. त्यासंदर्भात केईएम हॉस्पीटलकडून आलेल्या अहवालात मृतदेह कुजण्याच्या शक्यतेमुळे केस गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निलीमा चव्हाणची बॅग हस्तगत करण्यासाठी पोलीसांकडून बॅग सर्च ऑपरेशन सुरु आहे. एका साक्षीदाराला ही बॅग सापडली होती. ती बॅग त्याने जगबुडी नदीमध्ये फेकून दिली होती. त्या बॅगचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. चार होड्या, दोन ड्रोन, 80 पोलीसांची आठ पथके शोध घेत आहेत. आतापर्यंतच्या तपासामध्ये प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याची माहिती अथवा तथ्य समोर आलेले नाही. तरीही पोलीस तपास सुरु असून साक्षीदारांकडे चौकशी चालू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.