विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; इतर जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता

जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश या पर्वतीय भागात हिमवृष्टी सुरू झाल्याने उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढत आहे. उत्तर हिंदुस्थानातून हे थंड वारे महाराष्ट्रात येत असल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 21 डिसेंबरपासून दिवस लहान असून रात्रीचा कालावधी वाढणार आहे. त्यामुळे आता राज्यात थंडीचा कडाका वाढण्यासही सुरूवात होणार आहे.

राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे राज्यभरात कोरडे वातावरण राहणार आहे. फक्त उत्तरेकडील थंडीच्या प्रभावाने पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा गारठा वाढणार आहे. तर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कायम राहणार असल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. तर दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून रात्री आणि पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.