राज्यातल्या जलवाहतुकीसाठी 1 हजार 133 कोटींचा निधी; नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-भाईंदरला जलमार्ग

 महाराष्ट्राला लाभलेल्या विस्तीर्ण सागरी किनाऱयाचा फायदा घेण्यासाठी किनारपट्टीवरील जलवाहतुकीला चालना देण्यासाठीसागरमालाहा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. ‘सागरमालायोजनेअंतर्गत 1 हजार 133 कोटी रुपयांचे तब्बल 34 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याची योजना आहे.

मुंबईतल्या वाढत्या वाहतूककोंडीवर मात करण्याठी मेट्रो रेल्वेबरोबरच जलवाहतुकीचा पर्याय शोधण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई व आसपासच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा- भाईंदर शहरांभोवती जलवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 टक्के निधी देण्यात येतो.

या योजनेत वसई, ठाणे-कल्याण या राष्ट्रीय जलमार्ग 53 मध्ये जलवाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात भाईंदर, कोलशेत, काल्हेर व डोंबिवली या चार ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने जेटी व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी 119 कोटी 38 लाख रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट’कडून पर्यावरणाचा दाखलाही दिला आहे.

जलवाहतुकीसाठी दुसऱया टप्प्यात ठाणे खाडीमध्ये वाशी, ऐरोली, ठाणे-मीठबंदर व मुलुंड या चार ठिकाणी जेटीच्या बांधकामासाठी 124 कोटी 54 लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.

जलवाहतुकीच्या तिसऱया टप्प्यात ठाणे खाडी व वसई खाडी (उल्हास नदी) एकमेकांना जोडण्यासाठी ठाणे-मीठबंदर ते कशेळी या जलमार्गात गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गाळ उपसणे, सॉफ्ट सॉईल ड्रेजिंग, रॉक ड्रेजिंगच्या कामावर 424 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून या खर्चाला मान्यता मिळण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

गेट वे ऑफ इंडियाची जेटी तीन वर्षांत

गेट वे ऑफ इंडिया येथे असलेल्या प्रवासी जेटीवर सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातील रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी जेटी बांधण्याच्या दृष्टीने 162 कोटी 20 लाख रुपयांचा प्रकल्प आखण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांत ही जेटी पूर्ण करण्याची योजना आहे. या जेटीचे काम पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई ते मांडवा, एलिफंटा, जेएनपीटीशी बोटीने सेवा जोडली जाईल. त्याशिवाय ठाणे, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई ही शहरे मुंबईशी जोडली जातील.

 जलवाहतुकीचा पर्याय हा पर्यावरणपूरक, आरामदायी व किफायतशीर असल्याचे मेरीटाइम बोर्डाच्या प्रस्तावात नमूद केले आहे. मध्यंतरी मुंबई क्रूझ टर्मिनस ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली होती, पण प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ही जलवाहतूक बंद पडली.

 महाराष्ट्र मेरीटाइम बोडामार्फत ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत 1 हजार 133 कोटी रुपये खर्चाचे एकूण 34 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी 200 कोटी 88 लाख रुपयांच्या खर्चाचे आठ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 445 कोटी 99 लाख रुपयांच्या खर्चाचे 14 प्रकल्प विविध टप्प्यांत प्रगतिपथावर आहेत. 486 कोटी 22 लाख रुपयांच्या खर्चाचे बारा प्रकल्प विकासाधीन असल्याचे  प्रस्तावात नमूद आहे.