मुंबईत एक हजार मेगावॅट वीज आणणार, आरे-कुडूस भूमिगत उच्चदाब वाहिनीसाठी 5710 कोटींचा निधी; चार वर्षांत काम मार्गी

मुंबईची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अदानी एनर्जीकडून कुडूस-आरे कॉलनी दरम्यान तब्बल 80 किलोमीटर लांबीची भूमिगत उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. 8 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी वेगवेगळय़ा वित्तीय संस्थांकडून 5 हजार 710 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या वीजवाहिनीचे काम आता युद्धपातळीवर केले जाणार असल्याने मुंबईकरांची भविष्यातील विजेची वाढती गरज सहजपणे पूर्ण करता येणार आहे.

सध्या मुंबईची विजेची कमाल मागणी चार हजार मेगावॅटच्या घरात असून प्रत्येक वर्षी त्यामध्ये 200-250 मेगावॅटची भर पडत आहे. तसेच 2027 पर्यंत ती पाच हजार मेगावॅटच्या पुढे जाईल असा अंदाज आहे.  मात्र मुंबईची अंतर्गत वीजनिर्मिती क्षमता 1800 मेगावॅट आहे. त्यामुळे विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उच्चदाब वीज वाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईबाहेरून वीज आणणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार अदानी एनर्जी भिवंडी तालुक्यातील कुडूस येथून आरे कॉलनीपर्यंत तब्बल एक हजार मेगावॅट वीज वाहून आणण्याची क्षमतेची भूमिगत वाहिनी टाकत आहे. मात्र आठ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या या प्रकल्पासाठी पुरेशा निधीची आवश्यकता होती. त्यानुसार कंपनीने जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थांकडे पाठपुरावा केल्याने नऊ संस्थांकडून साडेपाच हजार कोटींहून अधिक रक्कम उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाला वेग मिळणार असल्याचे अदानी एनर्जीने स्पष्ट केले आहे.

मुंबईकरांना हरित ऊर्जा पुरवणे शक्य होणार

अदानी इलेक्ट्रिसिटीचे उपनगरात 27 लाख वीज ग्राहक असून त्यांना दररोज दीड हजार मेगावॅटहून अधिक विजेचा पुरवठा केला जातो. दरम्यान, 2027 पर्यंत उपनगरातील वीजग्राहकांना त्यांच्या एकूण मागणीच्या 60 टक्के हरित ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची वीज महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमधून उपलब्ध होणार असून ती आरे-कुडूस वीजवाहिनीच्या माध्यमातून मुंबईत आणणे शक्य होणार आहे.