कसोटी क्रमवारीत दिग्गज संघांना पाकिस्तानचा दे धक्का, लंकेचा डंका वाजवून पाकिस्तान अव्वल

श्रीलंकेच्या दौऱयावर असलेल्या पाकिस्तानने यजमानांचा त्यांच्याच देशात डंका वाजवला. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश संपादत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीच्या गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. सध्या पाकिस्तान 24 गुणांसह गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे, तर 16 गुणांसह हिंदुस्थानची दुसऱया स्थानी घसरण झाली आहे. 

पाकिस्ताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा 2-0 असा दणदणीत पराभव केला. श्रीलंकन फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली. श्रीलंकेचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला. श्रीलंकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना सर्वबाद 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 576 धावांचा डोंगर उभा केला. 410 धावांच्या आघाडी गाठताना लंकन फलंदाजांची दमछाक झाली. संपूर्ण संघ 188 धावांवर गारद झाला. या विजयासह पाकिस्तानने इतिहास रचत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या शर्यतीत हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या दिग्गज संघांना मागे टाकलं आहे. 

पाकिस्तानने रचले तीन मोठे विक्रम 

पाकिस्तानने विदेशात इतक्या मोठय़ा फरकाने पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानने 200 हून अधिक धावांनी विजयाची नोंद केली. तसेच श्रीलंकेत सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला. पाकिस्तानने श्रीलंकेत पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. पाकिस्तानने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत परदेशात षटकामागे चार धावा करण्याचा विक्रमही करून दाखवला.