तुम्ही निष्पाप नाही…; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांना फटकारले

सर्वोच्च न्यायालयात आज रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहीरात प्रकरणी सुनावणी झाली. योगगुरू रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत जनतेची माफी मागावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्णही सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी उपस्थित होते. दोघांनीही वैयक्तिकरित्या सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली. माफी स्वीकारलेली नसल्याचे सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. बाळकृष्ण आणि पतंजली यांना जाहिरात प्रकरणाबाबत सार्वजनिक निवेदन जारी करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे.

मागच्या आठवड्यात 10 एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. तेव्हा खंडपीठाने रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. सुनावणी दरम्यान न्यायालयाने रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना विचारणा केली. न्यायमूर्ती कोहली रामदेव बाबा यांना म्हणाले, ‘तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती आहात. योग क्षेत्रात फार काम केले आहे. तुम्ही व्यवसायही करु लागलात.’ त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडिओच्या प्रसारणात व्यत्यय आला. तीन मिनिटांनी फक्त ऑडिओ आला. न्यायमूर्ती कोहली म्हणाले की, ‘हा अडथळा केवळ योगायोग आहे, आमच्या बाजूने कोणतीही सेन्सॉरशिप नाही.’ न्यायालयाने बाबा रामदेव यांना विचारला की, ‘तुम्हाला माफी का द्यावी?’ त्यावेळी रामदेव बाबा यांनी न्यायालयाला सांगितले की, ”मला माहित आहे कोट्यवधी लोक माझ्यावर अवलंबून आहेत. मी यापुढे जागरुक राहीन”. त्यावर न्यायालयाने टिप्पणी करत म्हंटले की, ”हे सगळं आमच्या आदेशानंतर तुम्ही केले. तुम्हाला माहित आहे की, तुम्ही असाध्य रोगांची जाहिरात करू शकत नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे”. यावर रामदेव बाबा म्हणाले ”आम्ही बऱ्याच चाचणी केल्या.” ज्यावर न्यायमूर्ती कोहली यांनी त्यांना रोखले आणि म्हणाले की, ‘हा तुमचा बेजबाबदारपणा आहे.”

आचार्य बालकृष्ण म्हणाले की, ”ही चूक अनावधाने झाली आहे, आमच्याकडे पुरावे आहेत”. यावर न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, ‘तुम्ही अॅलोपेथी उपचारपद्धतीवर बोट दाखवू शकत नाही. हे चुकीचे आहे. यावर रामदेव बाबा म्हणाले, ‘आम्ही उत्साहाच्या भरात हे केले आहे, आम्ही यापुढे सतर्क राहू. आम्ही अॅलोपोथीवर काही बोलणार नाही.’ न्यायमूर्ती कोहली म्हणाले, ‘न्यायालयात इतका साळसूदपणा दाखवताय, आज तुम्ही माफी मागत आहात. तसे होत नाही.’ यावर रामदेव म्हणाले की, ‘अशी चूक पुन्हा होणार नाही.’ यानंतर न्यायमूर्ती कोहली म्हणाले की, ‘तुमचा पूर्वीचा इतिहास वाईट आहे. तुमची माफी स्वीकारायची की नाही याचा विचार करू. आपण वारंवार उल्लंघन केले आहे.’ न्यायमूर्ती अमानतुल्ला म्हणाले की, ‘तुम्ही मनापासून माफी मागत नाही आहात. हे योग्य नाही.’

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रात जाहीर माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण या दोघांनाही पुढील सुनावणीच्या तारखेला म्हणजेच 23 एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे.