Amarmani Tripathi – अमरमणी त्रिपाठीची तुरुंगातून मुकत्ता होणार, तुरुंग प्रशासनाने मुदतीपूर्वीच सुटकेचे आदेश दिले

कवयित्री मधुमिता शुक्लाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन विभागाने हे आदेश दिले आहेत. या दोघांचेही तुरुंगातील वर्तन चांगले असल्याने दोघांची उर्वरित शिक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्यपालांच्या परवानगीने तुरुंग प्रशासनाने या दोघांच्या सुटकेचा आदेश जारी केला. त्रिपाठी दाम्पत्य 20 वर्षांनी तुरुंगातून बाहेर येणार आहे.

9 मे 2003 रोजी लखनौच्या पेपर मिल कॉलनीमध्ये कवयित्री मधुमिता यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला होता. तपास यंत्रणेने अमरमणी आणि त्याची पत्नी मधुमणी यांना दोषी ठरवून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मधुमिताच्या हत्येप्रकरणी अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी यांना डेहराडूनच्या विशेष न्यायाधीश/सत्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे दोघेही गेली 20 वर्षांपासून तुरुंगात आहेत.

त्रिपाठी दाम्पत्य हे गोरखपूर कारागृहात आहेत. या दोघांना अन्य कोणत्याही खटल्यात तुरुंगात ठेवणे गरजेचे नसेल, तर त्यांना दोन जामीन आणि जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्यात यावे, असे आदेशा गोरखपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. दोन जामीन आणि जातमुचलक्यावर या दोघांना तुरुंगातून सोडण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

मधुमिता आणि अमरमणी त्रिपाठी यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांबाबत अमरमणीच्या घरी काम करणाऱ्या देशराजने पोलिसांना माहिती दिली होती. तिथून या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली होती. 24 ऑक्टोबर 2007 रोजी डेहराडूनच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने अमरमणी, त्यांची पत्नी मधुमणी, पुतण्या रोहित चतुर्वेदी आणि शूटर संतोष राय यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

सुप्रीम कोर्टाचा स्थगिती देण्यास नकार

मधुमिता शुक्ला हिची बहीण निधी शुक्ला हिने अमरमणी त्रिपाठीच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला होता. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी या दाम्पत्याच्या सुटकेच्या निर्णायवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या गुन्ह्यातील आरोपींची तुरुंगातून सुटका करू नये, असं केल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल. या निर्णयाचा मी विरोध करत आहे. भाजप बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देते आणि महिलांवर अत्याचर करणाऱ्यांना तुरुंगातून सोडते.