राहुल गांधी यांच्या शिवतीर्थावरील सभेला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रा उद्या दुपारी दोन वाजता नंदूरबार जिह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 मार्चला या यात्रेचा समारोप शिवतीर्थावर होईल. यानिमित्ताने होणाऱया जाहीर सभेत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवतीर्थावरील जाहीर सभेचे निमंत्रण दिले असून त्यांनी हे आमंत्रण स्वीकारल्याचे थोरात यांनी सांगितले.

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 15 जानेवारीला मणिपूरमधून झाली होती. 13 मार्चला धुळे, मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्च रोजी मुंबईत दाखल होईल. भारत जोडो न्याय यात्रा देशातील 15 राज्ये, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघातून 67 दिवसांत 6700 किमीचा प्रवास करत आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक’ या घोषवाक्यासह ही यात्रा पुढे निघाली आहे.

रश्मी शुक्ला यांचीही घेतली भेट
राहुल गांधी यांच्या यात्रेसोबत देशभरातील अनेक नेते राज्यात दाखल होणार आहेत, ही बाब लक्षात घेता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या भेटीत या यात्रेबाबत त्यांनी एक निवेदनही दिले असून या यात्रेबद्दल योग्य ती माहितीही पोलिसांना देण्यात आली.

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला शिवतीर्थावर होणाऱया सभेस उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन निमंत्रण दिले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित होते.