सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

जिल्ह्यात आज पावसाने बऱयापैकी उघडीप दिली. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळच्या एक-दोन सरी सोडल्या तर दिवसभर पाऊस थांबलेला होता. गेल्या 24 तासांत सरासरी 14.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक 31.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

चांदोली धरण 81.27 टक्के भरले असून, धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून प्रतिसेकंद एक हजार 545, तर वीजनिर्मिती केंद्रातून 911 असा एकूण दोन हजार 456 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढली आहे. वाळवा तालुक्यातील वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द ते निलेवाडीकडे जाणाऱया पुलावर पाणी आल्याने सदरचा पूल बॅरिकेडिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाटय़ाने कमी होत आहे. सध्या सांगलीत आयुर्वेन पुलाजवळची पाणीपातळी 17 फूट 6 इंच झाली आहे.

जिह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे – मिरज 17.7 (192), जत 6 (144.2), खानापूर-विटा 9.8 (114.9), वाळवा-इस्लामपूर 15.5 (208), तासगाव 15.5 (193), शिराळा 31.8 (521.7), आटपाडी 4 (112.3), कवठेमहांकाळ 10.3 (159.4), पलूस 14.6 (177), कडेगाव 11.6 (137.5).