रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना दिल्लीचा ‘बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स’ पुरस्कार

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषी भूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना इन्टेलिक्च्युल पिपल्स फाउंडेशन दिल्ली यांचा बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स पुरस्कार मिळाला आहे. इन्टेलिक्च्युल पिपल्स फाउंडेशन ही संस्था हिंदुस्थानची अर्थव्यवस्था, देवाणघेवाण, आरोग्य, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, सामाजिक सेवा, बँकिंग सेवा आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि पदाधिकाऱ्यांच्या योगदान आणि कामगिरीबददल हा पुरस्कार देत असते.

इन्टेलिक्च्युल पीपल्स फाउंडेशन या संस्थेने बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स पुरस्कार डॉ. तानाजीराव चोरगे यांना जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे नुकतेच पार पडले. या पुरस्कार वितरणाला उत्तराखंडाचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत, राज्यसभा सदस्य अब्दुत खालिद, राजदूत डॉ. बी.बी.सोनी, ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे सहसचिव हरिपाल रावत यावेळी उपस्थित होते. गेल्या 16 वर्षांमध्ये डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेने केलेल्या प्रगतीची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आली आहे. डॉ. चोरगे यांना बेस्ट चेअरमनचा पुरस्कार आतापर्यंत दोनवेळा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना सहकारनिष्ठ व सहकारभूषण या दोन पुरस्कारांनी गौरवले आहे.