सीईटीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा 22 ते 30 एप्रिल या कालावधीत तर पीसीएम ग्रुपची परीक्षा 2 ते 16 मे या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेला 6 लाख 75 हजार 444 विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये 3 लाख 79 हजार 868 विद्यार्थ्यांनी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या गटातून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळावा यासाठी परीक्षा दिली होती तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या विषयातील गटातील कृषी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळावा यासाठी परीक्षा 3 लाख 14 हजार 765 विद्यार्थ्यांनी दिली आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्याने आणि पॅप फेरी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने या सीईटीचा निकालही कमी कालावधीत जाहीर करण्यासाठी सीईटी सेलकडून प्रयत्न सुरू आहेत. 31 मे किंवा जूनच्या पहिल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर करण्याचे नियोजन आहे. या परीक्षेची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीवर प्रसिद्ध केली आहे. पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना 24 मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल, तर पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांना 26 मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल.