सीबीआयची ‘क्लीन चिट’ मिळाली, प्रफुल्ल पटेलांना आता ‘मिर्ची’ही गोड लागेल; रोहित पवारांचा टोला

देशाचे नागरी विमान वाहतूक मंत्री असताना विमान खरेदी व्यवहारात तब्बल 840 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका असलेले ‘अजित पवार’ गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ‘मोदींच्या गॅरंटी’मुळे क्लीन चिट मिळाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी एअर इंडियासाठी विमान खरेदी करताना व्यवहारात घपला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात सरकारचे 840 कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ने आता बंद केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्यानंतर रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. सीबीआयच्या ‘क्लिन चीट’ नंतर आता प्रफुल्ल पटेलांना आता ‘मिर्ची’ही गोड लागेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

“ज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला आणि नंतर अजितदादांच्या कानी लागून सातत्याने पाठपुरावा केला ती CBI ची क्लीन चिट अखेर भावी ‘लेखकांना’ मिळाल्याचं दिसतंय. अनेक दिवसांपासून लोकांसाठी सकारात्मक बातम्या येत नसल्या तरी आजची बातमी बघून प्रफुल्ल पटेल साहेबांना ‘मिर्ची’ही गोड लागेल. या गोड बातमीबद्दल प्रफुल पटेल साहेबांचं अभिनंदन!”, असे खोचक ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

काय होते प्रकरण?

यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी केलेल्या विमान खरेदीत अनियमितता आढळली. या प्रकरणाचा भंडापह्ड होतात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ने करण्याचे आदेश दिले होते.

यानुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यासोबत सलगी केल्याने त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध एअर इंडिया लीजिंग प्रकरणाच्या संदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)