रोखठोक – भ्रष्ट दयावानांच्या देशात!

दिवाळीत फटाके  कमी आणि राजकीय स्फोट जास्त अशी स्थिती आहे. राजकारण्यांनी देशाचे चारित्र्य बिघडवले. श्रेष्ठ पुरुष निर्माण होणे आता थांबले. भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा करणाऱ्यांना दयावान म्हणावे लागते. सत्ताधारी पक्षाच्या बँक खात्यात पाच हजार कोटी जमा होतात. हे ‘दयावान’ देणगीदार कोण? याचा शोध घ्यावा असे कुणालाच का वाटू नये?

पाच राज्यांत निवडणुका आणि महाराष्ट्रात दिवाळीची धामधूम सुरू आहे. निवडणुका विधानसभेच्या, पण फटाके असे फुटत आहेत की, हिंदुस्थानच्या भूमीवर तिसरे जागतिक महायुद्धच सुरू आहे. सत्ता सगळय़ांनाच हवी व सत्ता कोणालाच सोडायची नाही. या पेचात लोकशाही फसली आहे. अनिल बर्वे यांच्या ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या गाजलेल्या नाटकात एक वाक्य आहे, “हिटलर हा माणूस होता की नाही ते सांगता येणार नाही; परंतु माणूस मात्र हिटलर असतो हे निश्चित.” राज्यकर्त्यांत चारित्र्य राहिले नाही. त्यामुळे ते खाली जनतेत उतरत नाही. सत्ताधारी भारतीय पक्षाच्या बँक खात्यात गेल्या पाच वर्षांत पाच हजार कोटी जमा झाले व या उदार देणगीदारांचा पत्ता माहीत नाही. आपल्या देशात इतके अज्ञात उदार देणगीदार निर्माण होतात याचे आश्चर्यच वाटते. पाच हजार कोटी देणारे कोण? त्यांचा तपास करावा असे देशातील तपास यंत्रणांना वाटत नाही. तटस्थता व चारित्र्याचा ऱ्हास झाल्याचे हे लक्षण. लोकांना प्रेरणा देणारे नेते राहिले नाहीत. जार्ज वाशिंग्टन याने अमेरिकेचे नेतृत्व केले. बऱ्याच वर्षांनी सन 1798 साली वार्धक्यामुळे वाशिंग्टनने निवृत्ती पत्करली व माऊंट व्हेरान येथे विश्रांतीसाठी जाऊन राहिले. त्यावेळी फ्रान्स अमेरिकेवर स्वारी करण्याच्या बेतात असल्याने प्रेसिडेंट आडाम्स याने वाशिंग्टनला पत्र लिहून कळवले की, “अमेरिकेचे सैन्य प्रबळ आहे, पण अगणित अशा सैन्यापेक्षा तुमच्या नावाचा प्रभाव अधिक आहे. तरी आपल्या नावाचा उपयोग करून घेण्याची आपली संमती असावी.” वाशिंग्टनच्या उदात्त वर्तनामुळे आणि श्रेष्ठ प्रतीच्या कर्तबगारीमुळे त्यांच्याविषयी त्यांच्या देशबांधवांना हा असा आदर वाटत असे.

दयावान कोण?

भ्रष्ट मार्गाने जे संपत्ती गोळा करतात तेच आता ‘दयावान’ असल्याचा आव आणतात. हे लोक वर वर धनवान असले तरी वृत्तीने कमालीचे दरिद्री असतात. एका सत्पुरुषाने सांगितले आहे, “अशा लोकांकडची लक्ष्मी कुत्र्यावर बसलेली असते. त्यामुळे या लक्ष्मीची शक्ती कुत्र्याइतकीच सामान्य असते. ती गजराजाप्रमाणे नसते. त्यामुळे या लक्ष्मीचा उपयोग परोपकार, राष्ट्रीय कार्य यासाठी होत नाही. हीन दर्जाच्या कामात होतो व हीच लक्ष्मी मग ‘पाच हजार कोटीं’च्या रूपात सत्ताधाऱ्यांच्या खात्यात जमा होते. महाराष्ट्रात आमदार खरेदीसाठी प्रत्येकी पन्नास कोटींप्रमाणे याच लक्ष्मीचा वापर झाला. एका वरिष्ठ नेत्यांकडे बसलो असताना चर्चेत माहिती मिळाली. सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे गट आहेत, त्यांची दिवाळी जोरात आहे. घरपोच एक कोटीचे पॅकेज त्यांना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे चारित्र्य. त्या चारित्र्याची लक्तरे रोज निघत आहेत.

गुलाम आणि गरीब

विन्स्टन चर्चिल म्हणते, “सत्य हे पराभूत होतं, कारण त्याचे अंगरक्षक असत्य असतात.” महाराष्ट्रासारख्या राज्यातील सत्य सध्या लांडग्यांच्या तावडीत सापडले आहे व सर्वोच्च न्यायालयाचा निवाडाही लांडग्यांच्या कळपांना मान्य नाही. स्पॅनिश भाषेत एक म्हण आहे की, “तुम्ही जर लांडग्यांच्या सहवासात राहिलात तर तुम्ही लांडग्यांसारखे वागाल. लांडग्यांसारखे आवाज वगैरे काढू लागाल.” आज सभोवतालचे चित्र यापेक्षा वेगळे दिसते काय?

श्रेष्ठ पुरुष कोण?

देशात व जगात आता श्रेष्ठ पुरुष जन्मास येणे बंद झाले आहे. जगभरातील व्यक्तिपूजक व अंधभक्त ज्यांना श्रेष्ठ पुरुष समजतात ते शेंदूर फासलेले दगड आहेत. ‘इसापनीती’मधील निळय़ा कोल्हय़ाच्या  गोष्टीप्रमाणे काही लोकांना नशिबाने, वशिल्याने आणि प्रजेच्या मूर्खपणामुळे ते छोटे असूनही मोठय़ा खुर्चीवर बसण्याचे भाग्य लाभले. पंतप्रधान मोदी यांनी 80 कोटी लोकांना फुकट ‘रेशन’ देण्याची योजना आणखी पाच वर्षांसाठी वाढवली. लोकांना रोजगार दिला असता तर ते स्वत:चे अन्न स्वत:च विकत घेऊन स्वाभिमानाने जगले असते, पण सरकारने गरीबांना गरीबच ठेवले व 80 कोटी लोकांना गुलाम बनवले. असे राज्यकर्ते काळाबरोबर नष्ट होतात. देश पारतंत्र्यात असताना एकदा जार्ज बर्नार्ड शा म्हणाला होता, “सर्व भारतीयांनी एकदम थुंकायचे ठरविले तरी त्यांच्या थुंकीच्या प्रवाहात ब्रिटिश साम्राज्य वाहून जाईल; परंतु हे साधे कामही अशा लोकांकडून होणार नाही.” बर्नार्ड शाचे हे बोलणे आजच्या स्वातंत्र्यातील पिढीसही लागू होते. धर्मांधता, गुलामीच्या बेडय़ात अडकवून लोकांना लाचार केले जात आहे व लोक त्यातच समाधानी आहेत. समाज भिकेवर आणि दयेवर जगतो आहे. आजच्या समाजाची अवस्थाच रामायणातील बेडकासारखी झाली आहे. वनात वास्तव्य करीत असताना प्रभू रामचंद्र एकदा पंपा सरोवरात पाणी पिण्यासाठी गेले. आपले धनुष्यबाण सरोवराच्या तीरावर रोवून ते सरोवरात उतरले. पाणी पिऊन झाल्यावर ते वर आले. येऊन बघतात तो त्या बाणाने जखमी झाल्यामुळे एक बेडूक रक्तबंबाळ होऊन पडला आहे. या प्रकाराने दु:खी होऊन रामाने त्याला विचारले, “अरे, तू ओरडला का नाहीस? ओरडला असतास तर मला समजले असते आणि तुझी अशी दुर्दशा झाली नसती.” यावर तो बेडुक म्हणाला, “श्रीरामा जेव्हा आम्हावर संकट येऊन कोसळते, तेव्हा आम्ही तुझा धावा करतो. आता प्रत्यक्ष रामच मारायला धावला तर दुसऱ्या कुणाचा धावा करायचा.”

आज देशाची, समाजाची हीच परिस्थिती झालेली आहे. हावऱ्या, भ्रष्ट, फेकू वृत्तीचा बाण त्यांनी प्रजेच्या पोटात खुपसला आहे.

अशा स्थितीत त्या समाजाविरोधात ओरडून काय होणार?

जगात वाशिंग्टनचे चारित्र्य नाही व रामाचे सत्यही उरले नाही.

राहुल गांधी नव्या ‘भारत जोडो’ यात्रेला निघाले आहेत. इतकेच!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]