मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘सफरचंद’चा 100 वा प्रयोग

मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं ही मराठी रंगभूमीची बलस्थानं आहेत. असाच वेगळा विषय घेऊन रंगभूमीवर दाखल झालेलं ‘सफरचंद’ हे नाटक. गुजराती रंगभूमीवरील लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या दिग्दर्शकाने बसवलेलं हे नाटक लेखिका-अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी मराठीत अनुवादित केले आहे. कश्मीरसारख्या वेगळय़ा भौगोलिक प्रदेशातील कथानक मांडत तिथली माणसं, त्यांच्या व्यथावेदना मांडणारं हे नाटक प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले.

दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. रंगभूमी दिनाचे औचित्य साधत ‘सफरचंद’ या नाटकाचा 100 वा प्रयोग आज सायंकाळी 4 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले येथे सादर केला जात आहे. 33 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाटय़स्पर्धेत प्रथम पारितोषिकासह सर्वाधिक सात पुरस्कार या नाटकाने प्राप्त केले असून आत्तापर्यंत एकूण 25 पुरस्कार पटकावले आहेत. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांचे दोन फिरते भव्य रंगमंच हे या नाटकाचे आगळे वैशिष्टय़ आहे.

सरगम, अमरदीप निर्मित व कल्पकला प्रकाशित या नाटकात प्रमुख भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे साकारत असून शर्मिला शिंदे, प्रमोद शेलार, संजय जमखंडी, अमीर तडवळकर, अक्षय वर्तक, रुपेश खरे, राज आर्यन या कलाकारांच्या भूमिका आहेत.

मराठी रंगभूमी ही अतिशय समृद्ध, श्रीमंत आणि प्रगल्भ आहे. आजच्या मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत ‘सफरचंद’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग होणं हा दुग्धशर्करा योग आहे. अशा नाटकाचा एक भाग होणं ही माझ्यासाठी व माझ्या सहकलाकारांसाठीही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. लेखन, सादरीकरण अशा सर्वार्थाने हे नाटक परिपूर्ण आहे. रंगभूमीशी नातं असलेल्या प्रत्येकासाठी आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे आणि हा दिवस रंगभूमीवर प्रयोग सादर करत साजरा करता येणं यासारखं भाग्य नाही! – शंतनू मोघे