रोखठोक – सावकार ‘ज्यूं’च्या गमती!

सिंधी व शीख समाजावर विनोद होतात तसे ज्यूंवरही होत असतात. हे सर्व लोक अनेक ‘घाव’ झेलून उभे आहेत, टिकून आहेत. इस्रायल-हमास युद्धात ज्यू पुन्हा चर्चेत आले. ज्यू त्यांच्यावरील विनोद गांभीर्याने घेत नाहीत. कामात लक्ष देतात!

भारतात सरदारजींचे विनोद चवीने सांगितले जातात, तसे जगभरात इस्रायलमधील ज्यूंचे विनोद सांगितले जातात. या समाजाने अत्याचाराचे अनेक घाव झेलले व त्यातून हे लोक पुन्हा उभे राहिले. अल्बर्ट आइनस्टाईन हा ज्यू होता. भारत-पाकिस्तान युद्धात (1971) आघाडीवर असलेले जनरल जेकब हे ज्यू होते. तंत्रज्ञान, व्यापार, विज्ञान अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी झेप घेतली. फाळणीनंतर सिंधी, पंजाबी समाजाने ज्या यातना सोसल्या त्यातून या समाजात एक उपजत शहाणपण व व्यापार करण्याची वृत्ती निर्माण झाली. ज्यू समाजाचेही तेच आहे. सिंधी, शीख समाजावर अनेक विनोद होतात तसे ज्यूंवर होतात. एका म्हाताऱया ज्यूला अखेर रशिया सोडून इस्रायलला जाण्याचा ‘व्हिसा’ मिळाला. हा सद्गृहस्थ मॉस्को विमानतळावर पोहोचला. कस्टम अधिकाऱयाला त्याच्या सामानात लेनिनचा अर्धपुतळा सापडला.

“हे काय?”

“हे काय म्हणजे? हा महात्मा कोण असं तुला विचारायचे आहे काय? हा लेनिन आहे. एक थोर माणूस. ज्याने जगात कामगार वर्गास राज्यकर्ता बनविले. मीसुद्धा कामगार आहे.”

त्या सोव्हिएत अधिकाऱयाने कृतार्थ भावनेने म्हाताऱया ज्यूकडे पाहिले व कोणतीही विशेष तपासणी न करता त्याला विमानापर्यंत नेऊन सोडले.

तो म्हातारा ज्यू तेल अवीवच्या विमानतळावर उतरला. इस्रायली कस्टम अधिकाऱयाच्या नजरेस लेनिनचा तोच अर्धपुतळा पडला.

“हे काय आहे?”

“हे काय म्हणजे? हा कोण आहे? हा तोच लेनिन आहे. अत्यंत निर्दयपणे आपल्याला त्रास दिला. हरामखोर लेकाचा! या लेनिनला मी माझ्या टॉयलेटमध्ये ठेवणार आहे. माझ्या येथील घरी येण्यापासून त्यानेच मला रोखले. फारच यातना दिल्या.”

इस्रायली अधिकारी हसला व त्याला तपासणी न करता सोडून दिले.

अखेर तो वृद्ध जेरुसलेममधील त्याच्या कुटुंबाच्या घरी पोहोचला. घरी पोहोचताच खोक्यात पॅक केलेला तो पुतळा बाहेर काढत असताना त्याचा नातू आला.

“कोण आहे हा?”

“कोण म्हणजे? हा कोण दाढीवाला असे तुला म्हणायचे आहे का? माझ्या पोरा, हे पाच किलो सोने आहे.”

ज्यू हा असा चाणाक्ष आणि व्यापार करण्यात पुढे असतो. गुजराती, सिंधी व ज्यूंची व्यापारी मानसिकता सारखीच आहे.

धर्मातीत, पण…

ज्यू धर्मीयांसाठी निर्माण झालेले इस्रायल हे राष्ट्र धर्मातीत आहे. हे अनेकांना माहीत नसेल. वाळवंटात इस्रायल निर्माण झाले. डेव्हिड बेन गुरियन हे इस्रायलचे पहिले पंतप्रधान आणि भाग्यविधाते. फक्त 10 हजार 840 चौरस मैल क्षेत्रफळ असलेला हा देश आहे. एक गॅलनपेक्षा कमी पेट्रोल मोटारीत भरून हा देश पाहता येतो असे तेथे थट्टेने म्हटले जाते. इस्रायलमध्ये आज सर्व वर्गाचे आणि देशाचे ज्यू आहेत. त्यात रशियन ज्यूंची संख्या वाढते आहे. पैसा कमावणे व त्यातून सावकारी करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. जगातील श्रीमंत ज्यू मोठय़ा प्रमाणात सावकारीच करतात. त्याच ‘सावकारी’पायी अनेक सधन राष्ट्रे ज्यूंच्या अमलाखाली आहेत. जगभरातील ज्यूंवर त्यामुळे खूप ‘जोक्स’ प्रसिद्ध होतात. एका ज्यू माणसाची बोट समुद्रात भरकटली, फुटली व वाळवंटातील एका किनाऱयास लागली. अनेक वर्षे तो तेथेच अडकून पडला. त्या निर्जन बेटावर फिरून त्याने बरेचसे साहित्य जमा केले. त्यातून त्याने एक स्वतःसाठी घर, सामान ठेवण्याची खोली व एक प्रार्थनाघर (synagogue) निर्माण केले. अशा तऱहेने त्याने तेथे ‘शेजार’ निर्माण केला. एकदा तेथून जाणाऱया एका जहाजाची नजर त्याच्यावर पडली. त्या जहाजाने त्याची सुटका केली. जहाजावरील लोकांनी त्याच्या सामानाची आवराआवर करायला मदत केली आणि त्याला ‘बेट’ सोडण्यासाठी तयार केले. निघण्यापूर्वी एका नाविकाने त्याला विचारले, “काय रे! तू दोन सिनगॉग का बांधलेस?” यावर त्या ज्यूने भुवया वर केल्या.  खांदे उडवत एका सिनगॉगकडे बोट दाखवत तो म्हणाला, “ते माझे सिनगॉग आहे.”

“आणि ते दुसरे?”

“ओह! ते काय? त्यात मी कधीच पाय ठेवणार नव्हतो. दुसरा कोणी एखादा ज्यू येथे आलाच तर ते त्याच्यासाठी आहे!”

‘येशीहा’ या ज्यू तरुणाने नौकानयन स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक ‘टीम’ तयार केली. पण ‘प्रॅक्टिस’ न करताच ते स्पर्धेत उतरले. प्रत्येक वेळी ते मागे पडले. सर्व टीम मेंबर एकत्र आले व त्यांनी ठरवले, ज्या संघास सध्या यश मिळतेय तेथे आपल्यातला एकजण ‘हेरगिरी’ करायला घुसवायचा व त्यांच्या जिंकण्याचे रहस्य मिळवायचे. ठरल्याप्रमाणे तो हेर गेला व दोन दिवसांनी परत आला.

“ऐका! मी अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती आणली आहे.”

सगळय़ांनी कान टवकारले.

“मी त्यांच्या नौकानयन विजयाचे रहस्य शिकून आलोय. ते एकूण आठजण आहेत. त्यातले सातजण ‘रोईंग’ करतात (वल्हवतात) आणि फक्त एकजण मोठय़ाने हाकारे मारून खिदळत असतो.”

थोडय़ा गमती…

एक ज्यू आजोबा त्यांच्या दोन नातवंडांना घेऊन समुद्रावर गेले. पोरं वाळूत खेळत असताना अचानक मोठे वादळ सुटले आणि लहान नातू त्या हवेच्या झोक्याने समुद्राच्या पाण्यात पडला. आजोबा हवालदिल झाले. त्यांनी देवाचा धावा सुरू केला. “देवा, माझ्या नातवाला परत आण. त्याला वाचव!” त्याच वेळी आधीपेक्षा मोठे वादळ समुद्रात आले. लाट उसळली आणि बुडणारा नातू आजोबांच्या पायाशी येऊन पडला. आजोबांनी नातवाला पोटाशी धरले. त्यांनी आकाशाकडे पाहत म्हटले,

“पण त्याच्या डोक्यावर हॅट होती रे… ती कुठे आहे?”

एका महिला ज्यू धर्मगुरूस `pork’ म्हणजे डुक्कर खाण्याची चटक होती. एकदा ती रात्री स्वतःच गाडी चालवत शहरातील एका रेस्तराँमध्ये गेली आणि मसाल्याने भरलेल्या पूर्ण डुकराच्या पिल्लाची ऑर्डर दिली. वेटरने डुकराचे ‘तंदूर’ पिल्लू, त्या पिल्लाच्या तोंडात एक सफरचंद अशी ‘ऑर्डर’ आणून ज्यू बाईंच्या टेबलावर ठेवली. तेवढय़ात तिच्या चर्चमधला एक धार्मिक ग्रुप त्याच रेस्तराँमध्ये आला आणि तिच्याकडे पाहून त्यांना धक्काच बसला. धर्मगुरू बाई डुक्कर खाणार म्हणजे धर्म बुडालाच! त्या ज्यू बाईने स्वतःला सावरले व म्हणाली, “पहा, काय जमाना आलाय? काय ही जागा आहे!”

“म्हणजे?”

“इथे मी सफरचंदाची ऑर्डर दिली तर ते कसे सर्व्ह केले पहा.”

दुय्यम दर्जाचे नागरिक

व्यापाराचे आणि पैसे कमावण्याचे बाळकडू ज्यूंना घरातच मिळते. पैसे कमवा व सावकारी करा हा त्यांचा मंत्र आहे. इंग्लंडमध्ये एकेकाळी ज्यू अस्पृश्य होते. त्यांच्या वसाहती गावाबाहेर होत्या. त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे, पण ज्यूंनी ते सहन केले. ते व्यापार करू लागले. जगातली पहिली बँक त्यांनी काढली. जे ज्यू इंग्लंडमध्ये अस्पृश्य होते ते इंग्लंडमध्ये सावकार बनले. हमासने इस्रायलवर हल्ला करताच इंग्लंडचे पंतप्रधान तेल अवीवला उतरले व इस्रायलला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. याला म्हणतात, ज्यूंची आर्थिक महासत्ता. ज्यू लोक त्यांच्यावरील विनोद आणि चेष्टा गांभीर्याने घेत नाहीत. ते त्यांच्या कामात लक्ष देतात.

एक सर्वधर्मीय मित्रांचा घोळका रेल्वे प्लॅटफार्मवर उभा होता. त्यात एक अमेरिकन, एक रशियन, एक इस्रायली होता. एक ‘रिपोर्टर’ त्यात सामील झाला. त्याने विचारले, “excuse me, सध्या मटणाचा तुटवडा पडला आहे. त्यावर तुम्ही मत व्यक्त कराल काय?”

“कसला तुटवडा?” अमेरिकन म्हणाला.

“कसले  मटण?” रशियनने विचारले.

“What’s excuse me?” इस्रायलीने विचारले.

विनोद संपला. ज्यूंवरचे विनोद हे असेच असतात.

इस्रायल-हमास युद्धानंतर जगभरात ज्यूंवर चर्चा सुरू झाली म्हणून हे थोडे विषयांतर!

ज्यूंना विनोद कळत नाही, असे हिटलरचे म्हणणे होते, पण ज्यू विनोद गांभीर्याने घेत नाहीत हे सत्य आहे.

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]