2024 ला भाजप महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही, संजय राऊत यांचा ठाम विश्वास

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मित्र अदानींच्या कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवले व कंपनीला फायदा पोहोचवण्याचे काम केल्याचे उघड झाले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने आपल्या उद्योगपती मित्राला 3900 कोटींचा फायदा कसा मिळवून दिला याबाबत शक्तिसिंह गोहिल यांनी काढलेले प्रकरण गंभीर आहे, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, केंद्राच्या, महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्रालयामध्ये भ्रष्टाचार आहे. रोज असे प्रकरण येत आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न आहेच. यावर त्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे दंगली पेटवायच्या. लव्ह जिहादसारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे आणि मोर्चे काढायचे, दंगली घडवायच्या. बाकी त्यांच्याकडे आहेच काय? पण कितीही काही केले तरी 2024 साली भाजप महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही अशी गॅरंटी ‘इंडिया’ आघाडीतर्फे देतो, असे राऊत म्हणाले.

सनी देओलला एक न्याय, अन् नितीन देसाईंना वेगळा न्याय

दै. सामनामधील ‘फसवाफसवीचे नवे बुद्धिबळ, हिंदुत्व कोणी शिकवायचे?‘ या रोखठोक सदरामध्ये नितीन देसाई यांच्याबाबत केलेल्या एका उल्लेखाबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, आमचे धर्मेंद्र किंवा त्यांच्या कुटुंबाशी व्यक्तीगत भांडण नाही. हेमा मालिनी खासदार आहेत, सनी देओलही भाजपचेच खासदार आहेत. त्यांनी 60-70 कोटींचे कर्ज घेतले होते आणि हे कर्ज ते फेडू शकले नाही. म्हणून त्यांच्या बंगल्याचा लिलाव बँकेने पुकारला होता. त्यांची नोटीसही काढली होती. जाहिरातही दिली होती. पण 24 तासात दिल्लीतून सूत्र हलली आणि लिलाव थांबवला गेला. मग हाच न्याय नितीन देसाई यांना का लावला नाही? दिल्लीत त्यांनीही अनेक भाजप नेत्यांची, मंत्र्यांची भेट घेतली होती. माझे स्वप्न वाचवा असे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते, असे तिथली लोकं सांगतात. त्यांना वाचवले नाही. दिल्लीतून आले आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. सनी देओलला एक न्याय, कारण ते भाजपचे खासदार, स्टार प्रचारक आहेत आणि आमच्या नितीन देसाई यांना वेगळा न्याय, असा घणाघात राऊत यांनी केला.

पंतप्रधान मोदी मित्रावर मेहेरबान, अदानींचा 3900 कोटींचा घोटाळा, काँग्रेसचा गौप्यस्फोट

चांद्रयानाने तिरंगा फडकावलेल्या ठिकाणाला…

चांद्रयानाने चंद्रावर तिरंगा फडकावला या जागेला शिवशक्ती नाव देण्यात आले. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टिका केली. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, आमचं यावर काहीही म्हणणे नाही. हे श्रेय हिंदुस्थानच्या वैज्ञानिकांचे आहे. त्यामुळे मला असे वाटते की जिथे तिरंगा फडकावला त्या जागेला महान वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचे नाव द्यायला हवे होते. त्यांना भारतरत्नानेही गौरवण्यात यावे. पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या महान लोकांनी जे काम केले त्याचे फळ आता चांद्रयानाच्या रुपाने मिळतेय. पण वैज्ञानिक, विज्ञानाला विसरून प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व आणले जात आहे. आम्हीही हिंदुत्ववादी आहोत. पण काही गोष्टी विज्ञानाशी संलग्न असतात हे वीर सावरकरांचे म्हणण आहे. त्यामुळे विज्ञानावर कोणत्याही धर्माचे आक्रमण योग्य नाही.