नाशिक – इशारा मोर्चापूर्वी संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जबरदस्त गौप्यस्फोट केला. ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणीना गुरुवारी नाशिकमधून अटक करण्यात आली होती. ललित पाटीलच्या मैत्रिणी विधानसभेपर्यंत आहेत आणि त्यांना इथून हफ्ता जात होता असे राऊत यांनी म्हटले आहे. राजकीय आणि पोलिसांच्या आसऱ्याशिवाय इतका मोठा नशेचा व्यापार नाशिकला चालू शकत नाही असे राऊत यांनी म्हटले.

आमदाराला महिन्याला 16 लाखांचा हफ्ता?

संजय राऊत यांना काही गोपनीय सूत्रांनी गुरुवारी रात्री एक कागद दिला होता. याद्वारे काही आमदारांना दर महिना ड्रग माफियांकडून हफ्ता जात होता असे कळवण्यात आले आहे. एका आमदाराला दर महिना सोळा लाख रुपयांचा हफ्ता मिळत होता असे एकूण 6 आमदार आहेत असे माहिती देणाऱ्याने आपल्याला सांगितल्याचे राऊत यांनी म्हटले.

विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी होण्यास मनाई

शिवसेनेच्या या इशारा मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये असा सरकारी आदेशच शिक्षणाधिकाऱ्यांनी काढला आहे. विद्यार्थ्यांनी या मोर्चात सामील होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली होती आणि या बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती नील गोऱ्हेदेखील उपस्थित होत्या असे राऊत यांनी म्हटले. ‘गोऱ्हे यांनी शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभागी होऊ नये असे आदेश दिले. तुम्ही ड्रग्ज रॅकेटच्या सदस्या आहात का ? तुमचा पाठिंबा आहे का या नशेच्या बाजाराला? कोणत्या अधिकारात तुम्ही हे आदेश दिले ?’ असे सवाल राऊत यांनी डागले आहेत.