देव म्हणता आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसता? संजय राऊत यांची अजित पवार गटावर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणाऱ्या अजित पवार गटावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. शरद पवार यांनी आपले फोटो वापरू नका असं सांगूनही अजित पवार गट त्यांचे फोटो वापरताना दिसत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला कशाला हवेत शरद पवारांचे फोटो, तुम्हाला कशाला हवेत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो. तुमच्यात तेवढी धमक नाही का ? स्वत:चे किंवा स्वत:च्या वडिलांचे फोटो का वापरत नाही?

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, “जे शिवसेनेच्या बाबतीत फुटीनंतर घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडेल अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हयायतीत तोडण्यात आली आणि तुटलेल्या पक्षाला मूळ शिवसेना, चिन्हाची मान्यता मिळाली. शिवसेनेच्या फोडाफोडीच्या मॉडेलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि इतर मान्यता अजित पवार गटाला दिले जाईल अशी शरद पवार यांना भीती आहे. देशाच्या राजकारणातील हे अत्यंत विदारक चित्र आहे. पक्षाचा संस्थापक तिथे आहे , त्याचा पक्ष फोडून मालकी दुसऱ्याच्या हाती दिली जाते. असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं. म्हणून या देशातील लोकशाहीची, निवडणूक आयोगाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटते. “

शरद पवारांपासून लोकं फुटून गेली, तरीही म्हणतात की ते आमचे नेते आहेत. हे ढोंग आहे. तुम्ही तुमचा पक्ष स्थापन करा, तुम्ही तुमचे फोटो लावून मते मागा, असे राऊत यांनी अजित पवार गटाला सुनावले. ते म्हणाले की , “पवारांपासून फुटून गेलेली लोकं म्हणतात की शरद पवार हे आमचे देव आहे. मग देवाच्या पाठीत खंजीर का खुपसला ? बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे म्हणता मग बाळासाहेबांची शिवसेना का फोडली ? डरपोक लेकाचे!”