कश्मीरच्या सीमेवर ‘जवान’, तर देशात ‘किसान’ मरतोय; हीच मोदींची गॅरंटी, संजय राऊत कडाडले

चांदवड कांदानगरी आहे, पण कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. या देशात गद्दार आमदार, खासदारांना 50 कोटीचा भाव मिळतोय, पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. पंतप्रधान मोदी इथे आले तेव्हा कांदा आंदोलकांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. या देशात कधीकाळी ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमत होता. पण आज देशात दोघांचीही अवस्था खराब असून कश्मीरच्या सीमेवर ‘जवान’, तर देशात सर्वत्र ‘किसान’ मरतोय. ही मोदींची गॅरंटी आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे महाविकास आघाडीतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जाहीर सभेमध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत भाषणासाठी आले तेव्हा उपस्थितांनी शिट्ट्या, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. तसेच ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’, अशा गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून सोडले.

खासदार संजय राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान स्वत:ला विश्वगुरू समजतात. जगात मोठ्यामोठ्या गोष्टी केल्याच्या टिमक्या वाजवतात. बेरोजगारी हटवण्याच्या गोष्टी करतात. दोन कोटी रोजगार ही मोदींची गॅरंटी होती. पण कांदा निर्यातबंदीमुळे याच्याशी संबंधित 25 लाख लोकं महाराष्ट्रात बेरोजगार झाले असून कांदा उद्योगाचे 20 हजार कोटींचे नुकसान झाले. नाशिक, धुळे, सोलापूर, नगरला याचा फटका बसला असून कांद्यावर अवलंबून असलेला वाहतूक व्यावसाय, शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, मजूर भिकेला लागला आहे.

शेतकऱ्याला भाव मिळत नाही. मात्र भाजप नेत्यांनी कंपन्या स्थापन केल्या असून त्याचे मूळ गुजरातमध्ये आहे. आपला कांदा खरेदी करून गुजरातच्या माध्यमातून चढ्या किंमतीने विकायचा ‘गुजरात पॅटर्न’ सुरू आहे. हे व्यापारी कोण आहेत? इथल्या शेतकऱ्यांना का छळताहेत? हे अमित शहांनी सांगावे आणि या कंपन्या कोणाच्या आहेत हे देखील स्पष्ट करावे, असे आव्हान राऊत यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, देशात फक्त एकच गॅरंटी आहे ती म्हणजे फक्त आम्ही खावू आणि शेतकऱ्यांना खाऊ देणार नाही, त्यांच्या चुली पेटू देणार नाही, मुलाबाळांना रोजगार मिळू देणार नाही. हे चित्र बदलण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ दाखवावी लागेल आणि आगामी लोकसभा निवडणुकीत देशाची सूत्र इंडिया आघाडीकडे द्यावी लागेल, असे आवाहन राऊत यांनी केले.

राहुल गांधी देश जोडण्यासाठी, माणसांची मनं जोडण्यासाठी चालताहेत. ‘इंदिया गांधी आयी है, नयी रोषणी लाई है’ अशा घोषणा एकेकाळी दिल्या जात होत्या. आज तीच नवीन रोषणी, नवा प्रकाश घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. ते हजारो किलोमीटर चालताहेत, लोकांना भेटताहेत, चर्चा करताहेत आणि शेतकऱ्यांची ‘मन की बात’ही ऐकताहेत. काही लोकं फक्त आपलीच ‘मन की बात’ सांगतात. माझेच ऐका, दुसऱ्याचे ऐकायचे नाही म्हणतात. पण राहुल गांधी शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ‘मन की बात’ ऐकताहेत. ‘भारत जोडो न्याय यात्रे’ने मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणार नाहीत याची गॅरंटी दिली आहे, असे राऊत म्हणाले.