पारंपरिक गुजराती थाळी

>> संजीव साबडे

गुजराती खाद्यपदार्थ म्हणताच आपल्याला खमण, ढोकळा, पात्रा, खांडवी, फाफडा, पापडी, गाठिया व शेव, ठेपला, खाखरा, हांडवो, खिचू, लोचो, दाबेली असे अनेक प्रकार डोळय़ांसमोर येतात. हे सारे प्रकार आता राज्याच्या बहुसंख्य भागांत लोकप्रिय होऊ लागले आहेत. इतकेच काय, पण मुंबई आणि परिसरात अनेक गुजराती थाळी देणारी रेस्टॉरंट्स सुरू झाली आहेत. तिथे गुजराती तर जातातच, पण अधूनमधून मराठी तसेच उत्तर व दक्षिण हिंदुस्थानी कुटुंबेही गुजराती जेवणावर आडवा हात मारताना दिसतात.

गुजराती खाद्यपदार्थ म्हणताच आपल्याला खमण, ढोकळा, पात्रा, खांडवी, फाफडा, पापडी, गाठिया व शेव, ठेपला, खाखरा, हांडवो, खिचू, लोचो, दाबेली असे अनेक प्रकार डोळय़ांसमोर येतात. त्यातील पात्रा म्हणजे आपली अळूवडी, खिचू म्हणजे विशेषत कोकणात केली जाते ती तांदळाची उकड. खांडवी म्हणजे सुरळीच्या वडय़ा. लोचो म्हणजे ओलसर खमंग कुस्करून केल्यासारखा प्रकार आणि खमणी हीदेखील खमणची बहीण. म्हणजे बेसनच्या एकच भिजवलेल्या पिठातून हे तिन्ही प्रकार बनतात. गंमत म्हणजे ढोकळा, सुरळीच्या वडय़ा, फाफडा हे सारे प्रकार बेसनापासून बनतात. शिवाय हांडवोसाठीही बेसन लागतंच. एकंदरच गुजराती खाद्यपदार्थांमध्ये बेसनचं प्रमाण सुमारे 75 टक्के आहे. हे सारे प्रकार आता मुंबई व महाराष्ट्राला परिचित झाले आहेत. यांचे वैशिष्टय़ म्हणजे हे सारे अजिबात तिखट नसलेले आहेत. यांच्याबरोबर जी हिरवी ओली चटणी दिली जाते, त्यात गूळ वा साखरेचा गोडवा असतो. चुंदा तर पूर्ण गोड. कच्ची पपई किसून केली जाणारी संभारो नावाची चटणीही अजिबात तिखट नाही. काही ठिकाणी या पदार्थांबरोबर ज्या तळलेल्या मिरच्या दिल्या जातात, त्याही लांबडय़ा व जाडसर. म्हणजे तिखटपणा नसलेल्या. आपल्या वडापावची बहीण म्हटली जाणारी दाबेली हीही गोडच. बटाटय़ाची इतकी गोड भाजी कुठेच केली जात नसेल. या स्नॅक्सबरोबर विशेषत जिलबी खातात. ती तर पाकातूनच काढलेली.

फरसाण म्हणजे आपल्या दृष्टीने शेव, गाठय़ा. मिसळ करण्यासाठी उसळीत घालतात ते फरसाण, पण फरसाण म्हणजे जवळपास सर्व कोरडे खाद्यप्रकार. म्हणून गुजराती जेवणातील ताटात वाढल्या जाणाऱया ढोकळा, खमण, पात्रा, खांडवी, लोचो, छोटे समोसे, कचोरी अशा सर्व पदार्थांना फरसाण म्हणूनच संबोधले जाते. शिवाय चिवडा (ज्याला ‘चवडो’ म्हटलं जातं) हाही फरसाणचाच भाग. हे सारे प्रकार आता राज्याच्या बहुसंख्य भागांत लोकप्रिय होऊ लागले आहेत. इतकंच काय, पण मुंबई आणि परिसरात अनेक गुजराती थाळी देणारी रेस्टॉरंट्स सुरू झाली आहेत. तिथं गुजराती तर जातातच, पण अधूनमधून मराठी तसंच उत्तर व दक्षिण हिंदुस्थानी कुटुंबेही गुजराती जेवणावर आडवा हात मारताना दिसतात.

फोर्टमध्ये रेल्वे स्टेशनहून जवळच ‘साबर’ नावाचे खूप जुने रेस्टॉरंट. खरं तर ती खाणावळच. नृसिंह लॉजचाच तो भाग. तिथं बसलं की, समोर ताट येतं. मग त्यातील वाटय़ांमध्ये आमटी, तीन-चार पातळ भाज्या, कढी वाढायला सुरुवात होते. मग येतं फरसाण. त्यानंतर भात, पापड, रोटल्या किंवा फुलके. समोरच टेबलावर चटणी, लोणचं असतं. हवं तसं ते स्वतच घ्यायचं. फुलक्यावर लगेच तूप ताटातलं संपलं की, पुन्हा वाढलं जातं. आंब्याच्या हंगामात आमरस, एरवी अन्य गोड पदार्थ. शेजारी ग्लासभर मस्त टाक. लग्नातली पंगतच समजा. हे सर्व 35 वर्षांपूर्वी 15 रुपयांत असायचं. अनलिमिटेड थाळी. लोक पोट फुटेपर्यंत खायचे. भरपूर जेवणारे गिऱहाईक पाहून मालकही खूश व्हायचा. आता पंधरा रुपयांत वडापाव नाही येत. त्यामुळे ‘साबर’ची थाळी महागणं स्वाभाविकच.

मरिन लाइन्स व दुसरं चौपाटी भागातील ठाकर्सची दोन्ही (ठाकरवरून आलेलं नाव) रेस्टॉरंटही गुजराती थाळीसाठी उत्तम ठिकाणं. त्यांना 75 वर्षे होऊन गेली. बरंच महाग, पण पैसे वसूल होतात. ताटात इतके पदार्थ असतात की, विचारता सोय नाही. विविध डाळींपासून केली जाणारी कठोल भाजी, थंडीत उंधियू, तीन भाज्या, कढी, तीन फरसाण प्रकार, भात, पापड, फुलके वा रोटी, एक गोड पदार्थ. अत्यंत चविष्ट जेवण, पण दोन वर्षांनी एखाद वेळेस जावं असं. कुटुंबासह गेलात तर बिल काही हजारांत जाईल हे लक्षात ठेवायचं. महात्मा फुले मंडईसमोरच्या गल्लीत शिरलात की, उजव्या बाजूला राजधानीचा बोर्ड दिसतो. या रेस्टॉरंटला 38 वर्षे झाली. तिथलं जेवण अगदी उत्कृष्ट, सेवाही उत्तम. दुपारच्या वेळी तिथं कायम गर्दी असते. खरेदीसाठी बाहेरगावहून व उपनगरातून येणारे असंख्य लोक हमखास इथं येतात. अर्थात नेहमी नाही. नेहमीसाठी या भागात गुजराती थाळीचे अनेक क्लब आहेत. तिथलं जेवण परवडतं लोकांना.

काळबादेवी मंदिरासमोर जोशी क्लब प्रसिद्ध आहे. तिथली गुजराती थाळीही प्रसिद्ध आहे. तिथलं आणि जवळच असलेल्या कल्पना क्लबचं जेवणही उत्तम असतं. या परिसरात अनेक गुजराती मंडळींचे व्यापारधंदे आहेत. तेथील अनेक कर्मचारीही गुजराती आहेत. त्यामुळे अशा खाणावळी चांगल्या चालतात आणि उत्कृष्ट जेवण वाजवी दरात देतात. ज्या भागात गुजराती मंडळींचे व्यवसाय आहेत, तिथं आधीपासून गुजराती थाळीची सोय होती. खाणावळ वजा क्लबमध्ये महिन्याची मेंबरशिप घेतली की, थोडी सवलत दिली जाते. माटुंग्याच्या पूर्वेला नाथालाल पारेख मार्गावर गुजराती क्लब बिल्डिंग आहे. तिथल्या रांगोळी रेस्टॉरंटमध्ये पूर्णपणे गुजराती जेवणं मिळतं. तिथं ठरवून रोज वेगवेगळय़ा भाज्या केल्या जातात.

पण नंतरच्या काळात गुजराती समुदाय जिथं राहतो, त्या गिरगाव, विलेपार्ले, मालाड, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, मुलुंड या ठिकाणी अनेक गुजराती रेस्टॉरंट सुरू झाली. पॅलिडियम, इन्फिनिटी अशा मॉलमध्ये ‘राजधानी’ वा ‘महाराजा भोग’ यांनी गुजराती थाळी सुरू केली. ताटात असंख्य वाटय़ा आणि दोन-तीन गोड पदार्थ, साध्या भाताऐवजी पुलाव, जेवणात पनीरचा वापर असं करून थाळय़ांचे दर एक हजार, बाराशे, पंधराशेपर्यंत नेले. तिथं जेवणं हे गुजराती तरुण पिढीचं स्टाइल स्टेटमेंट बनलं. तिथं जेवण्यानं प्रतिष्ठा वाढते असा समाज या वर्गात रुजू लागला. अतिशय सात्त्विक, कांदा, लसूण नसलेलं, कमी मसाल्याचं, बटेटानु साक, टमेटा अणे सेवनी सब्जी, कोथल, उंधियू, फरसाण, बेसन व दही यांची कढी, थोडं काही गोड… एवढय़ासाठी सात-आठशे ते बाराशे रुपये मोजणारा वर्ग गुजराती लोकांत आहे हे ओळखून त्यांच्या वस्तीत गुजराती थाळय़ा नेल्या.

अंधेरी पश्चिमेला स्टेशनजवळ रजवाडी गुजराती थाळी मिळते. तिच्यातील काही प्रकार पारंपरिक गुजराती थाळीपेक्षा वेगळे आहेत. ‘चा ठेपला’ रेस्टॉरंट म्हाडा कॉलनीत सुरू झालं आहे. अंधेरीच्या भक्तिवेदांत शाळेपाशी सुरू झालेल्या रसोत्सवमध्ये गुजराती व राजस्थानी वैशिष्टय़ाचं जेवण अलीकडेच सुरू झालं आहे. बाकी मालाडमध्ये लिंक रोडवर ‘ठक्कर थाळ’, तिथून काही अंतरावर ‘रसोडू’, कांदिवलीत स्वामी विवेकानंद रोडवर ‘जलाराम काठियावाडी’, इराणी वाडीत ‘टच ऑफ गुजरात’, बोरिवलीत ‘कंसार’ आणि ‘राधाकृष्ण काठियावाडी’ इथं गुजरातीच प्रकार, पण वेगळय़ा पद्धतीचे व चवीचे असतात. घाटकोपर पूर्वेला मनभावन प्रीमियम हॉलमधील थाळी प्रचंड महाग नसल्याने तिथं अनेक कुटुंबे येऊन जेवतात. मुलुंडच्या हनुमान मंदिरापाशी रसोई थाळी आहे. मुलुंडमध्ये भगत ताराचंदही आलाय, पण झवेर रोडवरील खाखरा, खिच्या पापड, गुजराती स्नॅक्सला न विसरता जावं. ते मस्त आहे.

[email protected]