सुरक्षेची ऐशीतैशी! विमानतळाची भिंत ओलांडून ‘मद्यधुंद’ व्यक्ती धावपट्टीवर

सध्या सुरू असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाय अॅलर्ट असतानाच एक व्यक्ती विमानतळाची भिंत ओलांडून धावपट्टीवर पोहोचला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी रविवारी दिली.

दरम्यान, या प्रकरणी ‘अतिसंवेदनशील’ अशा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) एका हेड कॉन्स्टेबलला कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून निलंबित केले आहे.

धावपट्टीवर पोहोचलेला व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. तो शनिवारी रात्री 11:30 च्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाच्या पायलटने प्रथम धावपट्टीवर पाहिला, असं त्यांनी सांगितलं.

पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला माहिती दिली ज्यांनी CISF ला घुसखोराचा पाठलाग करण्याचे निर्देश दिले.

सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला पकडले आणि दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले, असं त्यांनी सांगितलं. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती हरियाणाचा रहिवासी असल्याचं कळतं आहे.

निमलष्करी दलाने ‘अतिसंवेदनशील’ नागरी उड्डयन सुविधेतील गंभीर सुरक्षा उल्लंघनाची चौकशी सुरू केली आणि त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित केलं, असं सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे.