सरकार आपल्या दारी, निवडणुकीला घाबरी! सिनेट निवडणुकीला स्थगितीवरून आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडीसाठी घेण्यात येणारी निवडणूक गुरुवारी अचानक स्थगित करण्यात आली. निवडणूकाचा कार्यक्रम जाहीर झाला असताना, निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना ती अचानक स्थगित केल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले असून ही निवडणूक स्थगित का झाली याची कारणे काय आहेत असा सवाल मिंधे-भाजप सरकारला विचारला आहे.

गुरुवारी मुंबई विद्यापीठातर्फे एक पत्रक जारी करण्यात आले होते. यात म्हटले होते की, 17 ऑगस्च 2023 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पुढील आदेशापर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात येत आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, “पत्रकात लिहिल्याप्रमाणे “बैठकीनुसार” जे लिहिलं आहे ती बैठक कुठे झाली ? किती वाजता झाली, कोणाच्या घरी झाली, कोण बैठकीला हजर होतो, बैठकीचे मिनिट आहे का हे कोणालाच माहिती नाहीये. ” राज्यपाल बैठकीत होते की नाही, हा निर्णय त्यांना कळवला होता की नाही? या प्रश्नांचीही उत्तरे मिळत नसल्याचे आदित्य यांनी म्हटले.

घटनाबाह्य मुख्यमंत्री डरपोक

आदित्य ठाकरे यांनी मिंधे गट आणि भाजपवर तोफ डागताना म्हटले की , घटनाबाह्य मुख्यमंत्री डरपोक आहे. इतकी फोडाफोड करून , महाशक्ती त्यांच्यासोबत असून जर मुंबई विद्यापीठाची निवडणूक घेऊ शकत नसतील तर काय उपयोग? आदित्य यांनी म्हटले की, काल रात्रीपासून कुलगुरू, उपकुलगुरु सगळ्यांचे फोन बंद आहेत. यामुळे प्रश्न पडतोय की निवडणुकीला स्थगिती का देण्यात आली? काही गडबड झाली आहे का ?, पश्चिम बंगाल किंवा मणिपूरसारखं वातावरण इथे नाहीये. सगळ्या पक्ष, संघटना कोणताही वाद होऊ न देता, भांडण , मारामाऱ्या होऊ न देता निवडणूक लढवत होत्या. सवा लाख मतदारांनी यासाठी नोंदणी केली होती. मग स्थगिती का देण्यात आली ? या निवडणुकीला स्थगिती दिल्याने मिंधे आणि भाजप सरकार निवडणुकीला घाबरतं हे जनतेला कळालं असून, सरकार आपल्या दारी, निवडणुकीला घाबरी असं म्हणायची वेळ आल्याचे आदित्य यांनी म्हटले.