दहशतवादी हल्ल्यानंतरही मोदी सरकारचे तुणतुणे म्हणे, कश्मीरात शांतता आहे!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा निवडणुकीच्या प्रचारात दंग असताना पुँछमध्ये शनिवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक जवान शहीद तर चार जवान जखमी झाले. त्यानंतरही कश्मीरात शांतता नांदत असल्याचे तुणतुणे मोदी सरकारने वाजवले आहे. कश्मीरमध्ये शांतता परतली आहे आणि कश्मीरचा झपाटय़ाने आर्थिक विकास होत आहे असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. हिंदुस्थान पाकव्याप्त कश्मीर कधीही सोडणार नाही, परंतु जबरदस्तीने तो ताब्यातही घेणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. जम्मू आणि कश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राऊंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशाची आर्थिक प्रगती होत असून शांतता परत आली आहे, हे लक्षात घेता पीओकेच्या लोकांकडूनच हिंदुस्थानात विलीन होण्याच्या मागण्या पुढे येतील. त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही, असे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच पीओके आमचा होता, आहे आणि राहील असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.

कलम 370 रद्द केल्यापासून कश्मीरमधील स्थिती सुधारली

कलम 370 रद्द केल्यापासून कश्मीरमधील स्थिती सुधारल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्र्यांनी केला. तसेच लवकरच केंद्रशासित प्रदेशात अफस्पा म्हणजेच आर्म्ड फोर्सेस स्पेश वॉवर्स ऍक्टची गरजही भासणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, जम्मू आणि कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या प्रॉक्सी युद्धाचा संदर्भ देत त्यांनी इस्लामाबादने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवला पाहिजे. ते हिंदुस्थानला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, असेही संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

दोन आठवडय़ांत तिसरा हल्ला

गेल्या दोन आठवडय़ांतील हा तिसरा हल्ला आहे. 22 एप्रिल रोजी थानमंडीच्या शाहद्रा शरीफ भागात अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने 40 वर्षीय गावकऱयाचा मृत्यू झाला होता. तर 28 एप्रिल रोजी उधमपूरच्या बसंतगड भागात मोहम्मद शरीफ या ग्रामरक्षकाची हत्या झाली होती. याशिवाय 21 डिसेंबर रोजी पुँछमधील देहरा की गली आणि बुफलियाज दरम्यान मुघल रोडवर सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. राजौरीतील बाजीमाल जंगलातील धर्मसाल पट्टय़ात मोठय़ा तोफांच्या चकमकीत दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याच्या आठवडाभरानंतर हा हल्ला झाला होता.

चीनशी नुसतीच चर्चा

लडाखमधील मोठय़ा प्रमाणावरील जमिनीवर चीन दावा सांगत असताना या प्रकरणी चीनशी चर्चाच सुरू असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. पूर्व लडाख सीमेवरील वादावर चीनशी चर्चा सुरू आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राहतील. हिंदुस्थान सीमावर्ती भागात जलद गतीने पायाभूत सुविधांचा विकास करत असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.

घटना लाजिरवाणी आणि दुःखद

दहशतवादी हल्ल्याची घटना लाजिरवाणी आणि दुःखद आहे. या घटनेचा तीव्र निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली अर्पण करतो. तर जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवरून दिली आहे.