सिनेट निवडणुकीसाठी युवासेनेच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले

सिनेट निवडणुकीला विद्यापीठ प्रशासनाने स्थगिती दिली आहे. याचा जाब विचारण्यासाठी युवासेनेचे शिष्टमंडळ शुक्रवारी विद्यापीठात धडकले. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ विद्यापीठ कुलसचिव,निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.सुनिल भिरुड यांना भेटले.

या शिष्टमंडळाने भिरूड यांना निवडणूक प्रक्रियेला स्थगिती का दिली असा सवाल विचारला. यावर भिरूड यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मतदार यादीत त्रुटी असल्याची तक्रार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांना केली होती आणि त्यामुळे ही स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

स्थगिती आदेशानंतरही प्रशासनाने युवासेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. सर्वसामान्य गटातून खालील उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

  • प्रदीप सावंत
  • मिलिंद साटम
  • परम यादव
  • अल्पेश भोईर
  • किसन सावंत

तर राखीव गटातून खालील उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत

  • स्नेहा गवळी- महिला
  • शीतल शेठ – अ.जा
  • मयूर पांचाळ – इ.मा.व
  • धनराज कोहचडे – अ.ज
  • शशिकांत झोरे – भ.ज

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी बोलताना म्हटले की, “अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सगळ्या 10 जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत. काल ऑनलाईन आणि आज ऑफलाईन अर्ज सादर केले आहे. गेल्यावेळप्रमाणे यंदाही 10 पैकी 10 जागा जिंकू. हे कसे केले, का केले हे प्रश्न विचारायचे असेल तर विद्यापीठाला विचारावेत. निवडणुका कघीही झाल्या तरी सिनेटवर भगवा फडकेल आणि 10 पैकी 10 जागा आम्ही जिंकू. “

आशिष शेलार यांनी पत्र दिलं होतं ज्यात म्हटलं होतं की मतदार यादीत दुबार नावे आहेत. या पत्राच्या आधारे आणि अभाविपने घेतलेल्या आक्षेपामुळे निवडणुकीला तत्काळ स्थगिती देण्यात आली. विद्यापीठाकडून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. वगळण्यात आलेल्या मतदारांना पुन्हा अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. विद्यापीठाने अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. शेवटच्या दिवशी रात्री पत्रक काढण्यात आले. आणि निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. विद्यापीठाने म्हटले की आमची मतदार यादी ही फूलप्रूफ आहे. त्यामुळे एका पक्षाचे ऐकून विद्यापीठ काम करणार असेल तर ते योग्य नाही, असे सरदेसाई यांनी म्हटले.