वडाळा, माटुंगावासीयांना मिळणार मजबूत पूल; नाना फडणवीस, तुळपुळे पुलांची दुरुस्ती

वडाळा येथील नाना फडणवीस रोड ओव्हर पूल आणि माटुंगा येथील तुळपुळे उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका सुमारे 11 कोटी 9 लाख 72 हजार 194 रुपये खर्च करणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे वडाळा, माटुंगावासीयांना मजबूत व टिकाऊ पूल मिळणार आहे. अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल 3 जुलै 2018 मध्ये कोसळला. या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागला. 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळला आणि 7 प्रवाशांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील साडेपाचशेहून अधिक पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.