पंचवीस वर्षांपासून गावासाठी केलंय काय? मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंना घेरले

25 वर्षांपासून तुम्ही गावासाठी केलंय तरी काय? असा सणसणीत सवाल करत मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना जालन्यातील गोलापांगरी येथे घेराव घातला. मराठा समाजाच्या या पवित्र्याने एकच गोंधळ उडाला.

जालन्यातील गोलापांगरी येथे आज 5 मे रोजी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची प्रचारसभा होती. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत 25 वर्षांपासून आपण गावासाठी काय केलं? असा संतप्त सवाल करून एक मराठा, लाख मराठाची घोषणाबाजी केली. त्यामुळे त्याठिकाणी काही भाजप कार्यकर्तेही दाखल झाल्याने मराठा आंदोलकांसोबत बाचाबाची सुरू झाली. त्यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांना जायला सांगितले आणि शूटिंग करायलाही दानवेंनी मज्जाव केला. दरम्यान, काही वेळेने दानवे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढत सभा सुरू केली.

काल छत्रपती संभाजीनगर येथील पळशी येथे मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेमध्ये राडा केला होता. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झाली होती. तर आज जालन्यातील गोलापांगरी येथे मराठा आंदोलकांनी आपण पंचवीस वर्षांत गावासाठी काय केलं असा संतप्त सवाल विचारून रावसाहेब पाटील दानवे यांना घेराव घातला.