महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे भाजपला 200 पर्यंत पोहोचणेही मुश्कील; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

राज्यात उष्णता वाढत असूनही लोक तहान-भूक विसरून महाविकास आघाडीच्या सभांना गर्दी करताहेत. लोकांना आता एकच तहान लागली आहे ती म्हणजे हुकूमशाही वृत्तीच्या भाजपा सरकारला कायमचे हद्दपार करून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याची. त्यामुळे 400 पारचा नारा देणाऱया भाजपला 200 जागांपर्यंत पोहोचणेही मुश्कील आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ठणकावले. सध्या देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. हुकूमशाही रोखण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या जाहीर प्रचाराची सांगता आज विटा येथील जाहीर सभेने झाली. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपला नवा पर्याय दिला आहे. मित्रहो हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. गेली दहा वर्षे आपल्या देशावर आणि राज्यावर हुकूमशाही वृत्तीने राज्य करणाऱया जातीयवादी सरकारला घालवण्याची… तेव्हा उठा, कामाला लागा आणि राज्यातून, देशातून भाजपाला हद्दपार करा, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी जनसमुदायाला साद घातली. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतमालाला हमीभाव आणि शेतकऱयांच्या कर्जमुक्तीबाबत ठोस निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी काँग्रेस आमदार डॉ. विश्वजित कदम, शिवसेना उपनेते आणि सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना उपनेते, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, उमेदवार चंद्रहार पाटील, सांगली जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांचेही भाषण झाले.

भाजपने परिवार पह्डले – विश्वजित कदम

डॉ. विश्वजित कदम यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवताना कर्नाटकात महिलांची अवहेलना करणाऱया उमेदवाराला समर्थन देताना भाजपला लाज वाटली पाहिजे, अशी टीका केली. त्यांनी पक्ष, परिवार पह्डण्याचे काम केले. मात्र, महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबरोबर आहे. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले.

महाराष्ट्र संपत नसतो, तर तो संपवत असतो – बानुगडे

महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे; पण महाराष्ट्र संपत नसतो तर तो संपवत असतो. काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी केली, त्यातून काय साध्य झाले, असा सवाल करून बानगुडे-पाटील म्हणाले, काय झाले आत्मनिर्भर भारताचे… आधी तुमच्या पक्षाला आत्मनिर्भर करा, असा टोला लगावला. संताजी घोरपडे यांचा वारसा सांगणारे भाळवणीचे पैलवान चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी लोकसभेत पाठवा, असे त्यांनी आवाहन केले.