ही निवडणूक हुकूमशाही विरुध्द लोकशाही : नाना पटोले

लोकसभेची निवडणूक ही आता उमेदवारांची राहिली नसून, ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होत आहे. शेतकर्‍यांसह बेरोजगार, कामगार आणि सर्व वंचित घटकांकडे दुर्लक्ष करून सत्तेचा माज चढलेल्या भाजपला खाली खेचण्यासाठी जागरूकपणे मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज येथे बोलताना केले.

जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शहरातील जुना जालना भागातील पाठक मंगल कार्यालयात आज रविवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यात आणि देशात वातावरण पूर्णतः बदलले आहे. देशभरात भाजपा विरोधात वातावरण झाले असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठिशी जनता भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे राज्यात किमान ४५ जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी झालेली गर्दी हीच काळेंच्या विजयाची नांदी असून, केंद्रात १० वर्षे सत्तेत असलेल्या भाजप सरकारने शेतकरी, बेरोजगार, कामगार यांच्यासह सर्वसामान्य घटकांच्या अपेक्षांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात, वॉर्डात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना भरघोस मतांची लीड मिळेल, अशा पद्धतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजन करावे.