सोलापुरात महाविकास आघाडीची पदयात्रा

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन तुल्यबळ आणि तरुण आमदारांची लढत रंगली असून, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पदयात्रा व जाहीर सभेने शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराची सांगता केली. विशेष म्हणजे भाजपचे आमदार असलेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सकाळी कन्ना चौक येथून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेच्या मार्गावर महिला औक्षण करीत होत्या, तर काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करीत शिंदे यांचे स्वागत करण्यात येत होते. या पदयात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद भाजपच्या चिंतेचा विषय झाल्याची चर्चा सुरू आहे.

यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, माजी महापौर महेश कोठे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, विनोद भोसले, अशोक निंबर्गी, संजय हेमगड्डी यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी सहभागी झाले होते. या पदयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही निवडणूक सोलापूरकरांना न्याय देण्यासाठी आहे, असे सांगत सत्ताधारी पाच आमदार असतानाही प्रणिती शिंदे लढत आहेत, असे सांगितले. दुपारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात भव्य अशी शेतकऱयांची सभा झाली.