लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न, भाजपला किंमत मोजावी लागणार; केजरीवालांच्या अटकेवर पवारांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने ईडीच्या आडून शिखंडी डाव टाकला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असून केजरीवाल यांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल, अशी परखड प्रतिक्रिया दिली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. आम आदमी पार्टीही आक्रमक झाली असून देशभरात निदर्शने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढवला.

मोदींच्या भूमिकेला विरोध केल्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम करत असून देशभरात भाजपाची दहशत निर्माण केली जात आहे. भाजपला केजरीवाल यांच्या अटचकेची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देत शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही केला.

शरद पवार पुढे म्हणाले की, मोदी सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करून तुरुंगात ठेवले असून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यांना तुरुंगात डांबले जात आहे.

दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून केजरीवाल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाला असे धोरण बनवण्याचा अधिकार असतो आणि तशी यंत्रणाही असते. त्यात काही चुकले असेल तर भाजपने लोकांमध्ये जाऊन यावर सवाल उपस्थित करावा, कायदेशीर बाबी असतील तर न्यायालयात जावे. पण त्यांनी यापूर्वीच काही जणांना अटक केली असून आता थेट राज्याच्या प्रमुखाला बेड्या ठोकल्या आहेत. राज्याचे धोरण ठरवले म्हणून अशा प्रकारे अटक करणे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले. तसेच याचा परिणाम निवडणुकीवर होईल आणि आम आदमी पार्टी सर्व जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.