लढवय्या, निष्ठावंत शिवसैनिक हरपला; पांडुरंग सकपाळ यांच्या निधनाने हळहळ

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (61) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सुना असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे निष्ठावंत, लढवय्या आणि कडवट शिवसैनिक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

कडवट शिवसैनिक अशी पांडुरंग सकपाळ यांची ओळख होती. शिवसेनेचे पहिले गटप्रमुख, त्यानंतर 1995 साली उपविभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2009 साली त्यांच्यावर दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी सोपवली. दक्षिण मुंबई गिरगाव भागात काम करताना त्यांनी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावत विभागप्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला. निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेले पांडुरंग सकपाळ शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी असायचे. अनेक आंदोलनात त्यांना पोलिसांच्या लाठय़ा खाव्या लागल्या. जनतेच्या प्रश्नासाठी लढताना त्यांनी तुरुंगवास भोगला. तरीही ते मागे हटले नाहीत.

2014 साली कुलाबा विधानसभेतून तर 2019 साली मुंबादेवी विधानसभेतून लढताना त्यांनी प्रतिस्पर्ध्याला जोरदार टक्कर दिली. हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास शिवसेनेने विरोध केला होता. हॉकी टीमला इथून पिटाळून लावण्याच्या आंदोलनात ते आघाडीवर होते. ‘माय नेम इज खान’ आणि पाकिस्तान बॅण्डला विरोध करण्यातदेखील त्यांनी मोठी भूमिका बजावली. एक सामान्य कार्यकर्ता ते शिवसेनेच्या विविध पदांवर कार्यरत असणारे पांडुरंग सकपाळ शिवसेनेशी कायम एकनिष्ठ आणि पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहिले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

चंदनवाडी येथील हिंदू स्मशानभूमीत पांडुरंग सकपाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, अॅड. अनिल परब, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, सचिन अहिर, राजकुमार बाफना, उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभागप्रमुख माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सुधीर साळवी, मनोज जामसुतकर, माजी आमदार अशोक धात्रक, चंद्रकांत खोपडे, मधुभाई कुट्टी, सिद्धिविनायक मंदिराचे संजय सावंत, नरेंद्र राणे, कनुभाई रावल, अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कुटुंबाच्या दुःखात सहभागी

ज्येष्ठ शिवसैनिक माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुŠखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!!, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

झुंजार शिवसैनिक

पांडुरंग सकपाळ हा धगधगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभागप्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला. अनेक आंदोलनात पोलिसांच्या लाठय़ा झेलल्या. पण पांडुरंग मागे हटला नाही. पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता. असा झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला, अशा शब्दांत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी भावना व्यक्त केल्या.

निष्ठा कधी ढळली नाही

नाव पांडुरंग पण वीट शिवसेना. त्या विटेवरच्या या पांडुरंगाची निष्ठा कधी ढळली नाही. निधडय़ा छातीचा हा शिवसैनिक सर्व आंदोलनात अग्रभागी असे. निवडणूक असो की आंदोलन त्याचे पूर्ण नियोजन, आयोजन म्हणजे सकपाळ! माझ्या लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत त्याने केलेले सहकार्य विसरू शकत नाही. त्या विजयात माझ्या पांडुरंगाचा उल्लेखनीय वाटा होता, असा शब्दांत शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.