मिंध्यांच्या अपात्रतेबाबत पुढील आठवड्यात सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकणार

मिंधे गटाचे सरदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या अपात्रतेची डेडलाईन जवळ आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढील आठवडय़ात यासंदर्भात सुनावणी घेणार आहेत. दोन्हीकडील प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती विधान भवनातील सूत्रांकडून मिळाली.

अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मिंधे गटाच्या आमदारांना त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्यानुसार शिवसेनेच्या आमदारांनी त्यांचे उत्तर अध्यक्षांकडे दाखल केले आहे. मिंधे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर सादर करण्यास दोन आठवडय़ांची मुदतवाढ मागितली होती. अध्यक्षांनी त्यांना मुदतवाढ दिली होती. कोणाचे आमदार पात्र आणि कोणाचे आमदार अपात्र हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे.

निकालाच्या भीतीने मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटातील मंत्री आजारी

दरम्यान, अपात्रतेचा निकाल जवळ येताच मिंधे गटातील मंत्री आजारी पडले आहेत. सध्या सुरू असलेले साथीचे आजार त्यांना बाधले की निकालाच्या भीतीने ते आजारी पडले, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिंधे गटाचे प्रवक्ते, शालेय शिक्षणमंत्री हे आजारी पडल्याने आज मंत्रालयात आले नव्हते. त्यानंतर चर्चांना ऊत आला.