उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मशालीचा झंझावात

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली असून उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशालीचा झंझावात पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारसंघातील रेल्वे प्रवासी, उद्याने, जिम, योग शाळा, चौपाटी, मैदाने, ज्येष्ठ नागरिक कट्टा, हास्य क्लब आदी ठिकाणी भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधत आहेत.

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले असून प्रत्येक विधानसभा, शाखा प्रभागात भेट देऊन घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. नागरिकदेखील त्यांचे उत्साहाने स्वागत करत आहेत. नुकतीच अमोल कीर्तिकर यांनी दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयास भेट देऊन आदरांजली वाहिली. महाविकास आघाडीमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात अमोल कीर्तिकर यशस्वी झाले असून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजूट होऊन त्यांच्या विजयासाठी काम करत आहेत.

अमोल कीर्तिकर यांचे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, विनम्र स्वभाव जनतेला परिचयाचा आहे. कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली कामे याचा फायदा पक्षाला नक्कीच होईल, असे चित्र आहे. दुसरीकडे या मतदारसंघात महायुतीला अद्याप उमेदवार सापडलेला नाही.