एनसीबीची पनवेल, मुंब्य्रात कारवाई, मोठय़ा प्रमाणात कोडेन सिरप, अप्राझोलम आणि नायट्राझेपन गोळय़ा जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या पथकाने पनवेल आणि मुंब्रा येथे कारवाई करत आंतरराज्य ड्रग्ज तस्करांच्या टोळीला दणका दिला. पथकाने मोठय़ा प्रमाणात कोडेन सिरप, अल्प्राझोलम आणि नायट्राझेपन टॅबलेट्सचा साठा जप्त केला. ड्रग्जचा काळाबाजार करणाऱया एकाला अटक करून गुह्यात वापरलेली गाडी देखील जप्त केली आहे.

राज्यात एक आंतरराज्यीय टोळी सक्रीय असून ती बेकायदेशीरपणे फार्मास्युटिकल ड्रग्ज अन्य राज्यातून खरेदी करून मुंबई व आजुबाजूच्या शहरात विकत असल्याची खबर एनसीबीकडे होती. हे बेकायदेशीरपणे खरेदी केलेले फार्मा ड्रग्ज पनवेल येथे सुरक्षितपणे साठा करून ठेवत असल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने पनवेलला सापळा रचून टी एम शफी हा कारने त्याठिकाणी आला असता त्याला उचलले. मग त्याने सांगितल्यानंतर पथकाने साठा करून ठेवलेल्या ठिकाणातून 169.7 किलो कोडेन सिरप, अल्प्राझोलमच्या 12 हजार 400 टॅब्लेट हस्तगत केल्या. दरम्यान, मुंब्रा येथे देखील काही साठा असल्याची कबुली शफीने दिल्यानंतर पथकाने मुंब्रा गाठून अल्प्राझोलमच्या आणखी नऊ हजार 600 तसेच नायट्राझेपमच्या 10 हजार 380 गोळ्या हस्तगत केल्या.