रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपकडून मतदारांना जबरदस्तीने पैशांचे वाटप, शिवसेनेची आयोगाकडे तक्रार

तिसऱया टप्प्यातील प्रचार संपताच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू झाला आहे. राजापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडून अनोळखी व्यक्तींमार्फत मतदारांना जबरदस्तीने पैसे वाटले जात आहेत. नारायण राणे यांनाच मते द्या असा दबाव आणला जात आहे. यासंदर्भात शिवसेना उपनेते-आमदार राजन साळवी यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

राजन साळवी यांनी पुराव्यांसह तक्रार केली असून त्यामुळे भाजपचा पैशांचा खेळ उघड झाला आहे. राजन साळवी यांनी या लेखी तक्रारीमध्ये कोणत्या गावांमध्ये भाजपकडून पैसे वाटप केले जातेय त्याची तपशीलवार माहिती दिली आहे. त्यात राजापूरमधील तुळसुंदे, कुवेशी, जैतापूर, माडबन, मिठगवाणे आणि संपूर्ण राजापूर तालुक्याचा समावेश आहे. मतदार पैसे घेत नसले तरी त्यांच्या हातामध्ये पैसे कोंबून त्यांच्या सह्या भाजपवाले घेत आहेत. हा एकप्रकार आचारसंहितेचा भंग असून याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार साळवी यांनी केली आहे.