21 वर्षांपासून फरार आरोपी गजाआड; अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस होते मागावर

 पायधुनी परिसरात एका चोरीच्या गुह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यावर आरोपी पसार झाला होता. न्यायालयात सुनावणीला हजर न राहता तो  कुठेतरी लपून राहत होता. 21 वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत लपून राहण्यात यशस्वी झाला, पण अखेर पायधुनी पोलिसांनी त्याला शोधून काढले.

रौफ ऊर्फ बबलू शेख (55) असे त्या आरोपीचे नाव आहे. तब्बल 21 वर्षांपूर्वी एका चोरीच्या गुह्यात पायधुनी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या गुह्यात जामीन मिळाल्यानंतर रौफ पुन्हा कधी न्यायालयात नियमित हजेरीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्याला न्यायालयाने फरारी घोषित केले होते. तेव्हापासून पायधुनी पोलीस त्याचा शोध घेत होते, पण रौफचा थांगपत्ता लागत नव्हता. उपनिरीक्षक अनिल वायाळ व त्यांचे पथक फरारी आरोपींचा शोध घेत असताना रौफ हा नवी मुंबईतल्या खारघर येथील गोकुळधाम सोसायटीत ओळख बदलून राहत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून  रौफला पकडले. रौफ हा पायधुनी व्यतिरिक्त अन्य गुह्यांमध्ये ही फरारी आरोपी असून विविध पोलीस ठाण्यांची पथके त्याचा शोध घेत होती. अनेक पोलीस ठाण्यांनी त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलेली होती.