पाण्याच्या टाकीत पडून भावंडांचा मृत्यू; कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई, महापालिकेची हायकोर्टात माहिती

वडाळ्यात दोन भावंडांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती मंगळवारी पालिकेने उच्च न्यायालयात दिली. न्या. गौतम पटेल व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर पालिकेचे वरिष्ठ वकील अनिल सिंग यांनी ही माहिती दिली.

नुकसानभरपाईची रक्कम गार्डन कंत्राटदाराकडून दिली जाईल, असे अॅड. सिंग यांनी न्यायालयात स्पष्ट केले. इरावती इंटरप्रायझेस असे या कंत्राटदाराचे नाव आहे. पाण्याच्या टाकीवर झाकण बसवले असून आता कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असेही अॅड. सिंग यांनी  सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. पीडितांच्या कुटुंबीयांचे झोपडे का तोडले, असा सवाल गेल्या सुनावणीत न्यायालयाने केला होता. कारवाई नियमानुसार झाली आहे. कारवाईचे अन्य कोणतेही कारण नाही, असे प्रतिज्ञापत्र पालिकेने सादर केले. या प्रतिज्ञापत्राची खंडपीठाने नोंद करून घेतली.