प्रचाराचा धुरळा बसला, देशात 95 जागांसाठी उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्याच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. तिसऱया टप्प्यात देशभराच 95 जागांवर मतदान होणार असून 1 हजार 351 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होणार असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच मतदारसंघांत दिवसभर जाहीर सभा, रॅली, पदयात्रांचा धडाका पाहायला मिळाला.

तिसऱया टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशीव, लातूर, बारामती आणि माढा या मतदारसंघांत मतदान होणार आहे. या 11 मतदारसंघात एकूण 2 कोटी 9 लाख 92 हजार 616 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 258 उमेदवारांचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. मतदानासाठी एकूण 23 हजार 036 मतदान केंद्रे सज्ज झाली असून मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

बारामतीत 38 उमेदवार

या टप्प्यात बारामती मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार रिंगणात आहेत. माढय़ात 32 तर धाराशीवमध्ये 31 उमेदवार लढत आहेत.

– 11 मतदारसंघांत 1 कोटी 7 लाख 64 हजार 741 इतके पुरुष मतदार असून 1 कोटी 2 लाख 26 हजार 946 इतकी महिला मतदारांची संख्या आहे. बारामती मतदारसंघात पुरुष आणि महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
– बारामतीमध्ये पुरुषांची संख्या 12 लाख 41 हजार 954 तर महिला मतदारांची संख्या 11 लाख 30 हजार 607 इतकी आहे. दरम्यान, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.

– 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघांत एकूण 298 उमेदवार मैदानात उतरले असून त्यांच्यासाठी 2 कोटी 28 लाख 1 हजार 151 मतदार मतदान करणार आहेत.

– देशात आतापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून 190 जागांवरील मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱया टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 95 जागांवर मतदान होईल. या टप्प्यात गुजरातमधील सर्व 25 मतदारसंघांत मतदान होणार आहे.