ऑफलाईन बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी सोलापूर पालिकेतील चार अधिकारी, कर्मचारी निलंबित

सोलापूर महापालिका बांधकाम विभाग कार्यरत नसताना ऑफलाईन बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी चार अधिकारी व कर्मचारी यांना पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी निलंबित केले आहे. सहायक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी, आवेक्षक श्रीकांत खानापुरे, वरिष्ठ लिपिक आनंद क्षीरसागर, आवेक्षक नगर अभियंता शिवशंकर घाटे अशी निलंबितांची नावे आहेत.

महापालिकेचा बांधकाम परवाना विभागात कार्यरत नसताना बांधकाम परवाना देण्याचा प्रकास उघडकीस आला आहे. ऑनलाइन पद्धतीने कामकाज चालू असताना, ऑफलाइन पद्धतीने बांधकाम परवाना देण्यात आला होता. यासंबंधी तुकाराम राठोड यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता, सदरची कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बांधकाम परवानाधारकाकडे चौकशीदरम्यान बांधकाम परवाना प्रमाणपत्र नकाशा मिळून आला. त्यावर आवेक्षक श्रीकांत खानापुरे यांची स्वाक्षरी आढळली.

त्यांना बांधकाम परवाना देण्याचा अधिकार नसताना त्यांनी दिल्याचे आढळले. या प्रकरणात नियम डावलून बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी सहायक अभियंता व झोन क्रमांक आठचे अधिकारी झाकिर हुसेन नाईकवाडी, आवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे, जनसंपर्क विभागातील वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद क्षीरसागर चौकशीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आणखीन काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.