राजीनामा… बोलायचं असतं, द्यायचा नसतो! चंद्रकांत पाटील

‘राजकारणात काही खरं नसतं. आमदाराने एखाद्या प्रश्नावरून राजीनामा देण्याची घोषणा करायची असते, प्रत्यक्षात मात्र द्यायचा नसतो,’ अशी सारवासारव सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सोलापूर जिह्याला मंजूर झालेले भरड धान्य संशोधन पेंद्र बारामतीला नेण्यात आले आहे. यावरून सोलापुरातील वातावरण तापले आहे. याच मुद्दय़ावरून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी भरड धान्य पेंद्र सोलापूरला न आल्यास आमदारकीचा राजीनामा देऊ, असे जाहीर केले होते. आज सोलापूर दौऱयावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सारवासारवची भूमिका घेतली. ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर अनेक मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु आतापर्यंत कोणीही राजीनामा दिलेला नाही. राजकारणात काही खरे नसते, ‘राजीनामा देतो’ हा ठरलेला शब्द आहे; प्रत्यक्षात राजीनामा द्यायचा नसतो, ती बोलायची पद्धत असते,’ असे सांगत त्यांनी देशमुखांच्या वक्तव्यावर सारवासारव केली.