उत्तररंग (कथा)

56

<<  डॉ. विजया वाड  >>

काडीमोड

आजोबांच्या मर्जीनुसार आजीने चालणं नेहमीचंच… पण कधीतरी मनमर्जी आजीचीही!

टेबलावर वाफाळता चहा, स्वादिष्ट पोहे नि तिळाची मऊ वडी वा! बाबुरावांचा चेहरा अवघा उजळला. पत्नीनं – सावित्रीनं – सगळं कसं मस्त सजवून समोर ठेवलं होतं. तिळगुळाची मऊ वडी हा तर त्यांचा हळवाहळवा कोपरा. सावित्रीबाई चपला घालून बाहेर पडल्या तशी बाबूरावांनी प्रथम वडीवर झडप घातली.

‘‘तिळगूळ घ्या, गोड बोला… म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं? पण मला महत्त्व दिलं तर पापड मोडतो ना!’’ त्यांनी एकटय़ानेच बडबड केली नि त्यांचे लक्ष पोहय़ांच्या बाऊलखालच्या चिटोऱयाकडे गेले.

‘‘मी आपणाशी काडीमोड घेणार आहे. आल्यावर बोलू?’ चिठ्ठी बोलली.

‘‘आँ?’’ बाबुराव चकित नि क्षणार्धात थकित झाले.

काय? भांडण नै… तंट्टा नाही नि एकदम काडीमोड? पस्तीस वर्षे झाली. पोरं लग्न होऊन वायली झाली. येतात कधीमधी.

सावित्री एकटी सकाळी प्रभात फेरीला जाते… आपण बोलत नाही.

सावित्री एकटी सख्यासोबत सिनेमाला जाते… आपण तक्रार करीत नाही.

सावित्री हॉटेलात एकटी हादडते… आपण कुठे ब्र काढतो? मग?

काय के लिए काडीमोड? त्यांना कळेनाच! पोहे जाईनात हो!

बायको घरी येण्याची ते वाट बघू लगले. आली साडेनऊला.

‘‘हे… हे… काडीमोड प्रकरण काय आहे?’ त्यांनी दरडावून विचारले.

‘‘प्रॅक्टीस करीत नसलात तरी वकिली पास केलीय ना तुम्ही?’’

‘‘हो केलीय.’’

‘‘मग? काडीमोड माहीत नाही? घटस्फोट! डायव्होर्स!’’

‘‘अगं पण का?’’

‘‘मेरी मर्जी. आयुष्यभर तुमची खरकटी मी का काढू?’’

‘‘अगं हे म्हणजे टू थ्री मच गं! बायकोयस ना?’’

‘‘बायकोला मनही असतं. सिनेमा म्हणू नका… नाटक म्हणू नका… हॉटेल, मॉर्निंग वॉक… फिरणं… कश्शाची हौस म्हणून नाही.’’

‘‘पण तुला आडकाठी केली का?’’

‘‘त्याचा काय उपयोग?’’

‘‘बागेत भेटलं वाटतं कुणी.’’ ते म्हणाले.

‘‘उतारवयात कोण भेटणार?’’

‘‘अगं पण तू राहणार कुठे? खाणार काय? एवढाला खर्च?’’

‘‘तो निपटारा तुम्ही करायचा. मी काय म्हणून चिंता करू? बऱया बोलानं काडीमोड, महिना चाळीस हजार पोटगी नि राहायला हॉटेलात रूम.’’ सावित्रीबाई मजेत होत्या.

बाबुरावांची छाती दडपली. ते लगालगा आत गेले. तिळाची वडी घेऊन आले. ‘‘सावे, तिळगूळ घे नि गोड बोल गं.’

‘‘बरं. गोडीगुलाबीत काडी मोडा!’’

‘‘नको गं नको. तू म्हणशील तिथे येतो. नाटक, सिनेमा, हॉटेल, स्वर्ग, नरक… पाताळ… सप्तपाताळ… अवकाश… म्हणशील तिथे!’’

‘‘आता कसे? साधं एप्रिलफूल कळत नाही?’’

‘‘एप्रिलफूल जानेवारीत सावे?’’

‘‘माझा नियम! नवा! मी एप्रिलफूल कधीही करू शकते.’’ बाबुराव शटडाऊन! खुशहाल! सुटलो रे बाब्बा! असे झाले.

‘‘पाय चेपा…’’

‘‘चेपतो सावे.’’

…सध्या सेवेकरी आज्ञाधारक आहेत.

बायको के भी ‘दिन’ आते है दोस्तों! समझे क्या? बचके रहो!

 

आपली प्रतिक्रिया द्या