पाकिस्तानी तरुणीत भारतीय हृदयाची धडधड

त्याने एका पाकिस्तानी तरुणीला त्याचे हृदय दिले. अक्षरशः दिले. येथील एमजीएम हेल्थकेअरमध्ये झालेल्या या हृदय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कराची येथील आयेशा रशन या युवतीला जीवनदान मिळाले असून तिच्या शरीरात भारतीय हृदयाची धडधड सुरू झाली आहे.  आयेशाच्या हृदयाच्या झडपांमध्ये छिद्र असल्यामुळे तिच्यासाठी हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता. या शस्त्रक्रियेचा 35 लाखांपेक्षा जास्त खर्चभार रुग्णालय आणि चेन्नईस्थित ऐश्वर्याम ट्रस्टने उचलला होता. दिल्लीतील एका 69 वर्षीय ब्रेन डेड रुग्णाकडून तिला हृदय मिळाले नव्हे, नवसंजीवनीच मिळाली आहे.  आयेशा आता मायदेशी रवाना होणार आहे. मात्र मी नक्की परत येईल, असा कृतज्ञ भाव तिने आणि तिची आई सनोबर यांनी परतताना व्यक्त केला होता. पाकिस्तानातील डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितल्यामुळे त्या निराश झाल्या होत्या.